निष्काम कर्मयोगी पांडुरंग शास्त्री आठवले

Share

प्रा. अतुल विजय भावे, आबासाहेब मराठे महाविद्यालय, राजापूर

१९ ऑक्टोबर १९२०.’ सोनियाचा दिवस! एका गजबजणाऱ्या जनसमुदायात आपलं आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या एका महात्म्याने रायगड जिल्ह्यातील रोहा येथे जन्म घेतला. भविष्यात जगाची प्रबोधनरूपी रंगभूमी अर्थातच सेवामय कर्मभूमी गाजवणाऱ्या एका नाटकाची ही नांदी होती. त्या महात्म्याचे नाव ‘स्वाध्यायकार पांडुरंगशास्त्री आठवले!’ स्वाध्याय परिवारातील साऱ्यांचेच निष्ठेचे अन् लाडके व्यक्तिमत्त्व ‘दादा’!

पांडुरंगशास्त्री आठवले यांचे वडील वैजनाथशास्त्री हे वेदशास्त्रनिपुण होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पांडुरंगशास्त्री आठवले यांनी वेद, उपनिषदे आणि भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केला. १९४२पासून त्यांनी गीतेवरील प्रवचने द्यायला सुरुवात केली. गीतेतील कर्मयोगाचा त्यांनी पुरस्कार केला. ‘परमेश्वराची फक्त पूजा करण्यापेक्षा त्याची सेवा आणि सेवेमधील समर्पण हीच खरी भक्ती आहे!’ असा विचार त्यांनी मांडला. आपल्या श्वासात भगवद्गीता आणि तिचे सार असणारे पांडुरंगशास्त्री आठवले धर्मावर श्रद्धा असणारे होते; पण ते कर्मठ हिंदुत्ववादी नव्हते. त्यांचा हिंदुत्ववाद सर्वसमावेशक होता. त्यामुळेच जगभरातील अनेक अनुयायी त्यांना लाभले.

१९५४ मध्ये जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी भरलेल्या ‘अणुबॉम्बविरोधी परिषदेत’ त्यांनी भगवद्गीतेवर भाषण केले. तेथूनच त्यांना स्फूर्ती मिळाली व त्यांनी स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. याच स्फूर्तीच्या बळावर त्यांनी सौराष्ट्रामधील मच्छीमार समाजात कार्य केले. हाताच्या बोटावर मोजता यावेत इतकेच अनुयायी त्यांना सुरुवातीच्या कालखंडात मिळाले; पण पुढे त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. त्यांच्या स्वाध्याय परिवाराने केवळ गुजरातचा किनाराच नव्हे, तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा किनारा पादाक्रांत केला.

सामाजिक व अध्यात्मिक चळवळीचे त्यांनी स्वाध्याय परिवारामध्ये रूपांतर केले. ‘स्वाध्याय’ या संज्ञेत ‘स्व’ येतो. पण त्या ‘स्व’चा अर्थ ‘स्वार्थ’ नसून ‘स्वावलंबन’ आहे, ‘सहकार’ आहे. स्वावलंबन, भक्ती आणि सेवामार्गाने जाणाऱ्या समस्त स्वाध्यायींचा प्रवास दादांनी आखून दिलेल्या राजमार्गावरून अज्ञान, दारिद्र्य अंधश्रद्धा आणि दुःख याकडून ज्ञान, सुख आणि उच्च राहणीमानाकडे आजही सुरूच आहे.

दादांनी सर्वप्रथम संघटित केले ते मच्छीमारांना म्हणजेच ‘आद्य सागरपुत्रांना!’ त्यांनी आयोजित केलेल्या सागरपुत्र संमेलनाला लाखो लोक येत असत. दादांमध्ये कामाची शिस्त व एक विशिष्ट लय होती. लांबलचक चौपाट्यांवर, वैराण रानावनात, दरिद्री खेड्यांमध्ये त्यांना ‘देव भेटला’ तो सामूहिक श्रमाच्या स्वरूपात!

दादांनी जगभरात अनेक ठिकाणी स्वाध्याय परिवाराच्या केंद्रांची स्थापना केली व त्यातून अनेक भागांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक विकास केला. महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये पाजपंढरी गावामध्ये स्वाध्याय परिवाराची स्थापना करण्यात आली. दादांच्या कार्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. तरुण, लहान बालके, वृद्ध या साऱ्यांसाठी स्वाध्याय केंद्र सध्या पाजपंढरी या ठिकाणी कार्यरत आहे. १९ ऑक्टोबर २००३ हा दादांचा जन्मदिवस ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. स्वाध्याय परिवाराच्या दानपेटीत जमा झालेल्या पैशाच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी बोट खरेदी करण्यात आली. या बोटीचे नामकरण ‘मत्स्यगंधा’ असे करण्यात आले असून या व्यवसायामध्ये मिळणारा नफा समाजकार्यासाठी वापरण्यात येतो.

महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच देशातील इतर राज्यांबरोबरच अनेक देशांमध्ये दादांचे असंख्य अनुयायी आहेत. ‘वसुधैव कुटुंबम’ हा विचार त्यांनी सार्थ करून दाखवला. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वतःला कधीही ‘गुरू’ म्हणून घेतले नाही. ते त्यांच्या अनुयायांमध्ये ‘दादा’ म्हणूनच ओळखले जात असत.

मच्छीमारांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना १९९६मध्ये ‘मॅगसेसे पुरस्कार’ देण्यात आला. त्यानंतर धर्मातील महत्त्वाच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘टेम्प्लेटन पुरस्कार’ मिळाला. काही पुरस्कारांना पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या कठोर तपश्चर्येमुळे एक विलक्षण उंची प्राप्त होते. दादांच्या बाबतीतही तसेच होते. या पुरस्काराहूनही सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे त्यांना मिळालेले लक्षावधी अनुयायी! तसे दादांचे कार्य जगाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन पोहोचले होते. या जागतिक कीर्तीच्या पुरस्कारांमुळे दादांच्या जगन्मान्यतेवर शिक्कामोर्तब झाली. बीजारोपण करून रोपाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत या रोपाचे संरक्षण व संवर्धन करून त्याच्या वाढीच्या काळात त्याच्यापासून फारकत घेणारे संस्थापक अनेक असतात; परंतु आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वाध्यायरूपी बीजाचा प्रचंड विशाल आणि विराट महावृक्ष करण्यासाठी तन-मन-धनाने धडपडणारा दादांसारखा ‘कर्मयोगी’ विरळाच! त्यांचे कार्य इतके महान आहे की, त्यांच्या कार्यरूपी भास्कराला आपले डोळे दिपवू नयेत म्हणून ते किलकिले करून वंदन करण्यात कोणालाही धन्यता वाटावी. खरंच ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती | तेथे कर माझे जुळती…’

२५ ऑक्टोबर २००३! दीपोत्सवातील ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्ञान, भक्ती आणि सेवाव्रताची ही पणती विझली. वयाच्या ८४व्या वर्षी या महात्म्याने आपली इहलोकीची यात्रा संपविली. ‘जीवनात तू असे कार्य कर की, तू मरताना हसत असशील आणि इतर सर्वजण रडत असतील,’ या कबिरांच्या वचनातील सत्यता येथे प्रत्ययाला आली. दादा स्वाध्याय परिवाराला पोरकं करून गेले; पण जाताना असंख्य स्वाध्यायींना जगण्याचं एक बळ, एक नवी उमेद देऊन गेले. त्यांच्या कार्याचा स्वाध्यायरुपी नंदादीप सदैव तेवत राहील!

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

50 seconds ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…

5 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

18 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

38 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

58 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago