Share

अरुण बेतकेकर

मातोश्रीहून फतवा निघाला, ‘यापुढे शिवसेनेच्या जाहिरात – प्रसिद्धीत केवळ दोघांचेच फोटो असतील. एक उद्धवजी आणि दुसरे आदित्यजी, अन्य कोणाचाही नको आणि या फतव्याचे तंतोतंत पालन व्हावे.’ शिवसेनेत स्थापनेपासून प्रसिद्धीत बाळासाहेबांना पर्याय नव्हता. त्याचबरोबर त्या-त्या विभागातील विभागीय नेते, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख अनिवार्य, असा शिष्टाचार होता. बाळासाहेबांना अशा क्षुल्लक बाबीत लक्ष घालण्याची गरज कधी भासली नाही. हा साधारण २०१३-१४ म्हणजे बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेचचा काळ. पण ही जाहीरपणे सांगण्याची बाब नव्हती. अंमलबजावणीसाठी आपल्या विश्वासातील विभागप्रमुख आणि निवडक पदाधिकाऱ्यांचा वापर करण्यात येत होता. प्रयोग झाला, पण प्रचंड टीका, विरोध सहन करावा लागला. सगळ्यांसाठी हे ‘अवघड जागेचे दुखणे’ होऊन बसले. ‘सांगता येत नाही, सहनही होत नाही’ अशा परिस्थितीत ते वावरत असत. विचारणा झाल्यास पळवाट म्हणून ते सांगत, बाळासाहेब आता हयात नाहीत म्हणून त्यांचा फोटो नको. हा प्रयोग काही केल्या यशस्वी होईना. कालांतराने या कटकारस्थानास नैसर्गिक मरण आले. बाळासाहेबांमध्ये आत्मविश्वास ठासून भरला होता. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा संपूर्ण विश्वास होता. त्यांनी स्वतःला कधीही कमजोर भासू दिले नाही. त्यामुळे त्यांना पक्षात कधीही असुरक्षित वाटले नाही. स्वकर्तृत्वाने त्यांनी स्वतःचे असे वलय निर्माण केले, ज्यातून स्वतःला पर्याय निर्माण होईल, अशी संधी कोणालाही मिळू शकली नाही. त्यांनी सर्व नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे संघटनेबरोबरच नेतेही बहरत गेले. वाटल्यास ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण त्यांनी ‘रिमोट कंट्रोल’ आपल्या हाती ठेवण्याचे स्वीकारले. आजची परिस्थिती अगदी या विरुद्ध आहे. म्हणून बाळासाहेब हे एकमेव अद्वितीय ठरले.

प्रथमच महाराष्ट्रात १९९५-२००० दरम्यान शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापन झाली. १४ मार्च १९९५ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून आरूढ झाले. त्यांना स्वतःच्या जावयाचे पुण्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरण अंगलट आले व जानेवारी १९९९ साली म्हणजे साधारण सव्वाचार वर्षांत त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे वय ४० वर्षे. त्याच वेळी त्यांना मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले होते. पण बाळासाहेबांनी, नारायण राणे यांच्यावर विश्वास दाखवत फेब्रुवारी १९९९ साली त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यांची कारकीर्द १७ ऑगस्ट १९९९ पर्यंत राहिली (काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून १७ ऑक्टोबर १९९९). याच दरम्यान केंद्रातही भाजप-शिवसेना व युतीची सत्ता होती. अनुकूल परिस्थिती पाहून केंद्राबरोबरच लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्याची रणनीती युतीने तयार केली. ऑगस्ट १९९९ महाराष्ट्र विधानसभा विसर्जित झाली. त्यामुळे नारायण राणे यांची कारकीर्द ५ महिने आधीच संपुष्टात आली. म्हणजे ते जेमतेम सहा महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बाळासाहेबांनी त्यांना आपली सत्ता पुन्हा येणारच व तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल, असे आश्वासन दिले होते. काही ‘अटी-शर्तीं’सह ५ सप्टेंबर १९९९ महाराष्ट्रात निवडणूक पार पडली व ७ ऑक्टोबर १९९९ रोजी निकाल जाहीर झाले. आश्चर्यकारकरीत्या केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस व आघाडी सरकार सत्तेवर आले. त्याचबरोबर नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी आरूढ करण्याची बाळासाहेबांची इच्छा अपूर्ण राहिली.

याच १९९९ निवडणुकीदरम्यान शिवसेनेत एक छुपी मोहीम राबविली जात होती. येथे बाळासाहेबांच्या आजारपणाचे दाखले दिले जात होते. आगामी १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेब प्रचाराला बाहेर पडू शकणार नाहीत. प्रचाराची धुरा स्वतः उद्धव ठाकरे आपल्या खांद्यावर घेणार आहेत. बाळासाहेबांचे वारसदार म्हणून यापुढे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या जाणार वगैरे, वगैरे. अशा बातम्या हेतूपुरस्सर पेरल्या जात होत्या. पण याउलट बाळासाहेब मात्र संधी मिळेल तसे आपण ठणठणीत असल्याचे वक्तव्य करीत. आपण प्रचार करणार, महाराष्ट्रभर फिरणार असे ठासून सांगत आणि त्यांनी ईर्षेने तसे केलेही. ऐकण्यात येत होते की, बाळासाहेबांना मातोश्रीत जखडून ठेवण्याचे षडयंत्र त्यांनी स्वतः उधळून लावले. सत्तेनंतरची निवडणूक, वातावरण सकारात्मक, त्याउपर बाळासाहेबांच्या आजाराची भावनिक वातावरण निर्मिती, सत्ता येणारच; तर प्रचाराची धुरा स्वतः सांभाळत सर्व श्रेय आपल्या पदरी पाडून घेण्याचा उद्धवजींचा प्रयत्न नाकाम ठरला, त्याचबरोबर नाकाम ठरला उद्धवजींचा मुख्यमंत्री बनण्याचा मनसुबा आणि जागृत झाली, यापुढे आपल्याहूनी सरस वा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना शिवसेनेतून नेस्तनाबूत करण्याची असुरी इच्छा. या असुरी इच्छेचे पहिले बळी ठरले नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे इत्यादी.

१९९९च्या याच निवडणूक प्रचारादरम्यान उद्धवजींनी, अरुण बेतकेकर, म्हणजे मला स्वतःला संपूर्ण प्रचार दरम्यान बाळासाहेबांच्या सोबत राहायचे आणि दिवसाचा प्रचार संपल्यावर दिवसभराची इत्यंभूत माहिती दररोज त्यांना पुरविण्याची सूचना केली. मी विनंती करून सोबत अनिल देसाई यांना माझ्याबरोबर ठेवण्याची अनुमती मागितली, ती त्यांनी लागलीच मान्य केली. दरम्यान याबाबत काय घडत होते, याची प्रचिती मला नसे. दौरा नाशिक मुक्कामी पोहोचला असता बाळासाहेबांनी त्या रात्री आम्हा दोघांनाही बोलावून घेतले. त्यावेळी अनिल देसाई माझ्यासोबत नव्हते. मी एकटाच पुढे पोहोचलो. बोलता-बोलता बाळासाहेबांनी प्रश्न केला.

बाळासाहेब – उद्धवजींशी बोलणे होते की नाही?
बेतकेकर – हो, कधी कधी.
बाळासाहेब – शेवटचे बोलणे केव्हा झाले?
बेतकेकर – दोन – तीन दिवसांपूर्वी असावे.
(काय बोलणे झाले. हे बाळासाहेबांनी कधीच विचारले नाही.)
बाळासाहेब – आपल्या सोबत आलेले ते (अनिल देसाई) कोठे आहेत?
बेतकेकर – काही वेळापूर्वी एक फोन करून येतो म्हणत ते बाहेर पडले, इतक्यात येतीलच.
बाळासाहेब – अच्छा! तर ते उद्धवजींशी बोलत असावेत. म्हणजे दररोजची ‘इत्यंभूत खबर’ उद्धवजींना देण्याचे काम हेच (अनिल देसाई)            करतात तर.

असे म्हणत बाळासाहेबांनी विषय बदलला. थोड्याच वेळात अनिल देसाई धावत तेथे पोहोचले. साहेबांनी त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला, पण
काहीही विचारले नाही. दौऱ्यात बाळासाहेबांच्या बरोबर आमच्याशिवाय कधी उद्धवजींची सासरे तर कधी बाळासाहेबांचे मेहुणेही असत. बाळासाहेबांवर असा हेरगिरीचा प्रकार चाललेला असे, हे कालांतराने बाळासाहेबांच्याच बोलण्यातून स्पष्ट झाले.

…उर्वरित भाग उद्याच्या अंकात
(लेखक, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे (संलग्न शिवसेना) माजी सरचिटणीस आहेत.)

Recent Posts

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

20 minutes ago

IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…

1 hour ago

Live: भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…

1 hour ago

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…

3 hours ago

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

3 hours ago