Categories: कोलाज

अलौकिक विभूतिमत्व ‘आनंदनाथ महाराज’

Share

राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने स्वामी कृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरू आनंदनाथ महाराज हे होत. आनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गावचे, म्हणून त्यांचे नाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली.

स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून आनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे स्वामी माऊलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून स्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहत बसले होते. आनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून उडी टाकून स्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात् परब्रह्ममाउली समोर उभी राहिलेली पाहून आनंदनाथांनी गहिवरून त्यांचे चरण हृदयी कवटाळले. स्वामीरायांनीही आपल्या जन्मजन्मांतरीच्या या लाडक्या निजदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून त्यांच्या ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा चरण पादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच स्वामीमहाराजांनी आनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले आत्मलिंग होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे नित्यपूजेत असून दर गुरुवारी भक्तांना त्याचे दर्शन मिळते.

स्वामी माऊलीने स्वमुखातून काढून दिलेल्या आत्मलिंग पादुका वेंगुर्ले येथे आहेत. स्वामी महाराजांचे श्रेष्ठ शिष्य सद्गुरू आनंदनाथ महाराज ह्यांची पवित्र संजीवन समाधी येथे आहे. शिर्डीच्या साईनाथाना जगतासमोर आणण्याच्या कार्यात यांचा मोलाचा सहभाग होता. स्वामी गुरुस्तव स्तोत्र, स्वामी चरित्रस्तोत्र, आत्मबोधगीता, भजनानंद लहरी, स्वामी समर्थ स्तवनगाथा (२७०० दिव्य अभंगांसहित) अशा स्वामी कृपेने भरलेल्या अद्भुत दिव्य रचनांची निर्मिती करून संजीवन समाधिस्थ झाले. सद्गुरू आनंदनाथांचे नातू गुरुनाथबुवा वालावलकर यांनी आनंदनाथ यांचे स्वामी समर्थ कार्य नेटाने पुढे चालवले.

“स्त्रियस्य चरितम् पुरुषस्य भाग्यम्’ या दोन्हींविषयी परमेश्वरदेखील अनभिज्ञ असतो अशा अर्थाचे एक संस्कृत वचन खरे ठरावे आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ‘वेंगुर्ले’ गावाला सिद्ध सत्पुरुषाचे सान्निध्य लाभावे या करिताच जणू नियतीने वालावलकर कुटुंबाची निवड केली असावी. या कुटुंबात जन्मलेला आणि ‘गुरुनाथ एकनाथ वालावलकर’ अशी नाममुद्रेची भरघोस खूण वागविणारा बालक चारचौघांसारखे लौकिक आयुष्य जगला, वाढला आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार करता झाला. ऐन उमेदीतल्या गुरुनाथ वालावलकरांनी चरितार्थासाठी हरड्याचा (औषधी गुणधर्माचे फळ) विक्री व्यवसाय सुरू केला. मात्र सारे काही स्थिरस्थावर होत असल्याची जाणीव होईपर्यंत त्यांच्या चाकोरीबद्ध आयुष्याला एकाएकी नवे वळण लाभले आणि पुढे आयुष्याच्या अखेरीस गुरुनाथांची ओळख आध्यात्मिक जगताकरिता ‘श्री आनंदनाथ महाराज’ अशी झाली. हे कोणामुळे घडले, का घडले, कसे घडले या सर्व अगम्य आणि अतर्क्य प्रश्नांची उत्तरे केवळ अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांकडे होती.

अक्कलकोटस्थ स्वामी समर्थांचा प्रिय शिष्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या व पुढे प्रस्थापितही करणाऱ्या आनंदनाथांचा जन्म तत्कालीन सावंतवाडी परगण्याच्या बांदा गावामधील मडुरे-डिगेवाडी येथे राहणाऱ्या वालावलकर कुटुंबामध्ये झाला. त्यांचे मूळ नाव गुरुनाथ. बालपण आणि तारुण्य सरताना गुरुनाथ उद्योगधंद्याच्या निमित्ताने वेंगुर्ला कॅम्प व बाजारभागात हरड्याचा व्यापार करू लागले. यानिमित्ताने त्यांचे मुंबईस वरचेवर येणे-जाणेदेखील होत असे. मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीट येथे बळवंतराव भेंडे ऊर्फ तात महाराज यांच्या व्यापारी पेढीवर गुरुनाथांचा मुक्काम होत असे. तात महाराजांच्या घरी, जांभूळवाडी येथेही त्यांचे येणे-जाणे असे. तात महाराज अनेकदा बाबूलनाथ येथे जात असत त्यावेळेस गुरुनाथही त्यांच्या सोबत जात असत.

तात महाराज प्रपंचात राहूनही परमार्थात उच्चतम अवस्था प्राप्त केलेले साधक होते. त्यांना श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह लाभला होता. एकेवेळी अक्कलकोट येथे गेले असताना त्यांना श्री स्वामी समर्थांच्या जागी साक्षात शंकराचे दर्शन घडले होते. तात महाराज गुरुनाथांना श्री स्वामी समर्थांविषयी नित्य सांगत असत. त्यामुळे गुरुनाथांची स्वामींना भेटण्याची तळमळ, उत्कंठा दिवसेंदिवस वाढती झाली.

एके दिवशी स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीची भेट व्हावी या तळमळीतून गुरुनाथांनी तडक अक्कलकोटच्या दिशेने धाव घेतली आणि ते स्वामीचरणी दाखल झाले. स्वामिरायांच्या भेटीसाठी मन आसुसलेले होते. कधी एकदा स्वामिचरणी नतमस्तक होऊ अशी त्यांची अवस्था झाली होती. या विचारात असताना त्यांना त्यांच्यामागे अस्पष्टशी हालचाल जाणवली. ते मागे वळून पाहतात तो काय! भक्ताभिमानी, कल्पतरू स्वामी समर्थ साक्षात उभे ठाकले होते. अक्कलकोटमधील स्वामींच्या सहवासातील ते काही क्षण गुरुनाथांच्या उभ्या आयुष्याला ढवळून काढते झाले. स्वामींच्या दिव्य, सगुण रूपामध्ये विरघळून गेलेले गुरुनाथ घरी आले असले तरीही मनाने मात्र स्वामींच्या चरणांपाशी घोटाळत होते. केवळ एका दृष्टिक्षेपात स्वामींनी त्यांचे आयुष्य बदलले. गुरुनाथांनी पत्नीची मनधरणी केली, घडला प्रकार सांगितला. त्यांची अवस्था पाहून त्यांच्या पत्नीने त्यांना ‘पुन्हा अक्कलकोटास जाण्यास’ आडकाठी केली नाही.

व्यापारधंद्याची जोखीम तात महाराज आणि पत्नीच्या खांद्यावर टाकून गुरुनाथ अक्कलकोटास निघाले. स्वामिस्वरूप परमेश्वराच्या सान्निध्यात अष्टौप्रहर रमणाऱ्या गुरुनाथांची भावावस्था दिवसेंदिवस प्रखर होत गेली. महाराजांची सेवा करण्यात गुरुनाथांचा सर्व वेळ खर्च होऊ लागला, देहभान नाहीसे झाले. ज्याला मोक्षरूपी वस्त्र प्राप्त झाले, तो देह झाकणाऱ्या वीतभर कापडाची तमा ती काय बाळगणार? स्वामी महाराजांनी गुरुनाथांमधील आत्मतत्त्व जागृत केले. बऱ्याचदा स्वामी गुरुनाथांना बोलावून ‘‘आनंद करा, आनंदनाथ व्हा!’’ असे सांगत असत. हे पाहून तेथील काही मंडळींनी गुरुनाथांचे नामकरण ‘आनंदनाथ’ असे केले. स्वामिकृपा प्राप्त झाल्यावर आनंदनाथांमधील सुप्तावस्थेत असलेली काव्य प्रतिभा अधिक तीव्रतेने प्रकट झाली. स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद आनंदनाथांसाठी सरस्वतीचा वरदहस्त ठरला. त्यांच्या काव्य प्रतिभेला स्वामींच्या दैवी साक्षात्काराचा स्पर्श झाला. आनंदनाथ महाराजांनी स्वामी महाराजांवर पाच हजारांहून अधिक अभंग, ‘अद्वैत बोधामृतसार’ व ‘अभेद कल्पतरू’ हे दोन ग्रंथ, त्याशिवाय श्रीगुरुस्तव, श्री स्वामिचरित्र, स्तोत्र तसेच अाध्यात्मातील अनेक कूट विषयांवर विविध रचना केल्या आहेत. त्यातील काही साहित्य गुं. फ. आजगावकर यांनी ‘स्वामी समर्थ स्तवनगाथा’ या ग्रंथातून प्रसिद्ध केले. अशातच स्वामी समर्थांनी साक्षात सरस्वतीस्वरूप ‘आत्मलिंग’ प्रदान केल्यामुळे आनंदनाथांची प्रतिभासृष्टी अधिकच बहरास आली. काव्यरसामध्ये न्हाऊन गेलेली त्यांची सहजसुंदर पदे, अभंग यामुळे स्वामींच्या चरित्र रेखाटनास अधिक उठाव मिळाला. स्वामी समर्थांच्या प्रिय शिष्यांपैकी असलेल्या या महत्त्वाच्या शिष्योत्तमाने अल्पावधीतच स्वामी समर्थ संप्रदायामध्ये मानाचे स्थान प्राप्त केले. आनंदनाथांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी केलेला स्वामिभक्तीचा प्रचार व प्रसार. ‘स्वामिराज गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।।’ हा स्वामिभक्तांमध्ये विलक्षण लोकप्रिय असलेला नामगजर रचणारे आनंदनाथ महाराज यांचे आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अलौकिक कार्य ‘शिर्डीच्या साईबाबांना आध्यात्मिक जगतामध्ये प्रसिद्धीस’ आणण्याचे आहे. स्वामींच्या आज्ञेने सावरगाव येथे जाऊन स्व-सामर्थ्याच्या बळावर ख्यातकीर्त झालेले आनंदनाथ शिर्डीवासीयांच्या आमंत्रणावरून शिर्डीत दाखल झाले आणि गावकऱ्यांच्या दृष्टीने उपेक्षित असलेल्या साईबाबांना भेटून ‘‘हा प्रत्यक्ष हिरा आहे’’ असा निर्वाळा देते झाले. या त्यांच्या शिर्डी आगमनामुळे शिर्डीकरांचे साईंविषयीचे प्रेम आणि आदर वाढला आणि साई शिर्डीमध्ये कायमस्वरूपी प्रतिष्ठापित झाले.

आनंदनाथांनी सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व नंतर श्रीस्वामी आज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. सावरगांव येथेही त्यांनी आश्रम स्थापन केला. मात्र पुढे ते वेंगुर्ले येथेच स्थायिक झाले. शिर्डीच्या साईबाबांना सर्वप्रथम, जगासमोर आणण्याची स्वामीरायांची आज्ञा आनंदनाथांनी पूर्ण केली.

-सतीश पाटणकर

Recent Posts

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

1 hour ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

2 hours ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

5 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

6 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

6 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

7 hours ago