Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीनाट्यगृहांत रसिकांचा उदंड प्रतिसाद; सिनेमागृहांकडे पाठ

नाट्यगृहांत रसिकांचा उदंड प्रतिसाद; सिनेमागृहांकडे पाठ

वैजयंती कुलकर्णी – आपटे

मुंबई : गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून बंद असलेली नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शुक्रवारी पुन्हा उघडल्यामुळे मनोरंजन क्षेत्रात पुनश्च हरिओम झाला आहे. अनेक नाट्यगृहात आज तिसरी घंटा झाली आणि नाटकांचा पडदा उघडला. सरकारने सध्या ५० टक्के आसन क्षमतेमध्येही नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळेच आज मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अनेक भागात नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे रसिक प्रेक्षकांसाठी खुली झाली आहेत.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नटराजाची आणि रंगमंचाची पूजा होऊन संस्कृतिक कार्यक्रम सादर झाले, तर मुंबईतील रंगशारदा नाट्यगृहात भाजपचे आमदार आशीष शेलार ह्यांच्या पुढाकाराने रंगमंचाची पूजा करून अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग झाला. तर, परळ येथील दामोदर नाट्यगृहात सुप्रसिद्ध गायक अरविंद पिळगावकर ह्यांच्या उपस्थितीत नाट्यसंगीताचा कार्यक्रम झाला.

नाट्यगृहांप्रमाणे चित्रपट गृहांचाही पडदा उघडला. पण तिथे मात्र प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि अनेक चित्रपटगृहांमध्ये आजचे खेळ रद्द करावे लागले.

मुंबईतही रंगशारदा नाट्यगृहात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. ‘रंगशारदा’ या नावातच रंग आणि शारदा आहे. रंगमंचाचे नाव आहे, नाटकार विद्याधर गोखले रंगमंचावरून आज पुन्हा तिसरी घंटा वाजवताना मला गहिवरून आले आहे, अशा शब्दात ‘मराठीबाणा’कार अशोक हांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रंगभूमीवरील तंत्रज्ञ व पडद्यामागच्या कलावंताना कोरोना काळात मदत करणाऱ्या अशोक हांडे, प्रशांत दामले, बाबू राणे,  प्रीती जामकर, रत्नाकर जगताप, हरी पाटणकर यांचा आशीष शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात यावेळी प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग रंगला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -