Sunday, June 16, 2024
Homeमहत्वाची बातमीसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने...

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

डॉ. वीणा सानेकर, उपाध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र, मुंबई

साहित्य संमेलनाचे सूप वाजले की, मराठीच्या प्रेमाचा जागर सर्वदूर सुरू होतो. मराठी माणसाला हा साहित्य जागर काय देतो? मराठीचे प्रेम वृद्धिंगत करतो? मराठीला बलिष्ट करतो का? साहित्यनिर्मितीची प्रेरणा देतो का? आपल्या भाषेविषयीचा सखोल अभिमान रुजवतो का? अशा अनेक प्रश्नचिन्हांना पोटात घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पाहिले जाते.

कोरोनाने लादलेल्या कुलुपबंद जगात गेली दोन वर्षं सातत्याने पडझड सुरू आहे. सबंध जगाचा चेहरामोहरा बदललेल्या या काळाने नानाविध आव्हाने निर्माण केली. या आव्हानांपैकी एक फार मोठे आव्हान, अभिव्यक्ती आणि संवादाचे आहे. माणसं या काळाने अधिक एकटी केली. घरांची बेटं झाली. थिजलेल्या, थबकलेल्या संवादाला प्रवाही ठेवण्याचे फार मोठे काम भाषा करते, फक्त आपल्या भाषेवर आपला विश्वास हवा.

मराठीची वाङ्मयीन संस्कृती समृद्ध आहे. लेखक, कवी, साहित्यिकांची मराठीत अक्षरश: मांदियाळी निर्माण झाली. १९६०नंतर तर ग्रामीण, महानगरी, आदिवासी, दलित-आंबेडकरी, स्त्रीवादी अशा अनेक अंगांनी मराठी साहित्याचा प्रवाह खळाळता झाला. विविध बोली, त्या बोलणारे विविध समाज, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती यांच्यासह नवी अभिव्यक्ती साकारली. मध्यमवर्गीय साहित्याच्या चौकटींना या साहित्याने हादरे दिले. कधी त्याने वेदना मुखर केल्या, तर कधी विद्रोह केला. मात्र या उलथापालथीपासून एक मोठा वर्ग दूर राहिला. या वर्गाला त्यांच्या जगातून बाहेर पडायची इच्छा नव्हती. या वर्गाला श्रीमंतीची नाना स्वप्नं खुणावत होती. या स्वप्नांमध्ये सातासमुद्रापलीकडची दुनिया होती, पण आपली भाषा नव्हती. जणू काही त्यांना जगण्याकरिता आपल्या भाषेची गरजच नव्हती. किंबहुना, आपल्या भाषेचे कवच त्यांना जाणवत नव्हते. या मायभाषा मराठीने खरे तर, त्यांना आपल्या मातीची, संस्कृतीची, इतिहासाची ओळख करून दिली होती, पण ती पुसून ते परक्या भाषेचे गुलाम झाले. ही इंग्रजी नामक भाषा त्यांच्या अवतीभवती हवेसारखी पसरली. या उसन्या हवेची या वर्गाला इतकी सवय झाली की, त्यांना आपल्या श्वासाइतकी आपल्यात भिनलेली मातृभाषा जाणवेना. त्यांना आपल्या भाषेतून व्यवहार करणे कमीपणाचे वाटू लागले. या आपल्या भाषेपासून दूर गेलेल्या समाजाने व्यवहारातून मराठीला वजा केले. ज्ञानभाषा म्हणून त्यांना मराठी निरुपयोगी वाटू लागली.

लोकभाषा, ज्ञानभाषा, व्यवहारभाषा या दृष्टींनी मराठीपासून फारकत घेऊन दूर गेलेल्या या समाजात अधिकाधिक मराठी भाषकांची भर पडत गेली. शिक्षणाची भाषा म्हणून मराठीवर फुली मारून त्यांनी पुढल्या पिढीची नाळ स्वभाषेपासून तोडून टाकली. मायमराठीतील शब्दांशी खेळण्याचा, नवे शब्दसृजन करण्याचा ध्यास न रुजवता उलट आपल्या भाषाबद्दलचा न्यूनगंड रुजवला. या सर्व पडझडीचे पडसाद बहुविध रूपांत उमटले. ग्रंथालये ओस पडणे, नियतकालिकांना घरघर लागणे, मराठी पुस्तकांचा वाचक कमी होणे, मराठी शाळांची पटसंख्या कमी होणे ही याची काही उदाहरणे. भाषा आणि साहित्य यांचे परस्परांशी अतूट नाते आहे. साहित्याचा प्रांत स्वतंत्र नि त्याचा भाषेतल्या उलथापालथींशी काही संबंध नाही, अशा प्रकारची दृष्टी उचित ठरणार नाही. पण ही दृष्टी बाळगून वावरणारे प्रथितयश साहित्यिकच अधिक दिसतात. त्यांना कवितांचे उरुस नि साहित्यजत्रा अशा उत्सवी कार्यक्रमांत रस असतो, पण मराठी शाळांच्या लढ्यांचे त्यांना काडीचे सोयरसुतक नसते.

साहित्यिक कुठेतरी पोकळीत बसून आपल्या निर्मितीत रमले आहेत आणि प्रत्यक्ष समाजव्यवहारातली मराठी आक्रसते आहे, अशा प्रकारचे चित्र स्पष्टपणे दिसते. मराठी मरते आहे वगैरे म्हणणे त्यांना चुकीचे, टोकाचे, अस्मिताबाज वाटते. कोणत्याही माध्यमात मुले शिकली तरी त्यांच्यावरचे मराठीचे संस्कार त्यांची मराठीशी नाळ जोडूनच ठेवतील, असे व्यासपीठावरून मांडले की, समोरच्या प्रेक्षकांनाही ते सोयीचे वाटते. कन्नडमधील लेखक शिवराम कारंथ यांनी साहित्याबरोबरच अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचा अनुवाद केला. अद्ययावत ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध झाले पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता.

त्यांच्या एका भाषणातला संदर्भ असा : ‘तुमचं तुमच्या भाषेवर प्रेम असेल, तर तुम्ही तुमच्या लेखनाबरोबर किमान एक तरी ज्ञानग्रंथ तुमच्या भाषेत आणला पाहिजे. नाहीतर तुमच्या भाषाप्रेमाला काहीच अर्थ नाही.’

कन्नडमधील आणखी एक साहित्यिक भैरप्पा यांच्या बाबतीतली एक गोष्टही खूप काही शिकवून जाणारी आहे. सरस्वती सन्मानानिमित्ताने देऊ केलेली जवळपास पाच लाखांची रक्कम परत करताना ते म्हणाले, ‘हे रुपये कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी वापरावेत म्हणजे आमचं साहित्य वाचणारा वाचक शिल्लक राहील.’ किती नेमकेपणाने आपली भाषा व तिच्या संवर्धनाची निकड त्यांनी अधोरेखित केली.
ग्रंथालये जगवणं सार्थ तेव्हाच ठरेल, जेव्हा वाचक तिथे वळेल. मराठी पुस्तकांकरिता अनुदान देणे तेव्हाच सार्थ ठरेल, जेव्हा मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणारा वाचक घडेल. मराठी कविता तेव्हा अधिक फुलेल, जेव्हा शाळाशाळांतून मराठी कवितांची समज विकसित करणारी संवेदनशीलता रुजेल नि साहित्य संमेलने तेव्हाच यशस्वी ठरतील, जेव्हा भाषेच्या बांधकामाच्या आणि तिला जगवण्याच्या लढाईत साहित्यिक थेटपणे उतरतील.
veenasanekar1966@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -