Share

डॉ. उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार

गेले जवळपास अठरा महिने देशात लॉकडाऊनची स्थिती राहिली. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण निवळलं असलं तरी शक्य तिथे कर्मचारी आणि कंपन्याही ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीला पहिली पसंती देत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य नसल्यास प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन जोमाने काम करण्यास सुरुवात देखील झाली आहे. वर्क फ्रॉम होम असो अथवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करणं असो, या दोन्ही बाबतीत कर्मचाऱ्यांना विचारलं, तर ते वीकेंडची आतुरतेने वाट पाहत असतात. हे जगभर सुरू आहे. आम्ही वीकेंडची वाट पाहत नाही, असं म्हणणारी मंडळी खोटं बोलतात. तसं पाहिलं तर शनिवार-रविवार हे देखील सोमवार ते शुक्रवारसारखे सामान्य वार. पण एकदा का त्याला वीकेंड हे लेबल लागलं की, सगळंच बदलतं. त्या वीकेंडच्या पुढे-मागे जोडून सुट्ट्या आल्या तर ती पर्वणीच असते.

अलीकडच्या काळात वीकेंड दोनच दिवसांचा का, तीन दिवसांचा का नको, असा सवाल पुढे येऊ लागला आहे. अनेक ठिकाणी ‘आठ तासांऐवजी बारा ते चौदा तास दररोज काम करतो, पण दोनऐवजी तीन दिवसांचा वीकेंड द्या’, अशी मागणी लोकप्रिय होत आहे. तसंच शक्य आहे तिथे कंपनी व्यवस्थापन हे मान्यदेखील करत आहे. नव्वदीच्या दशकात मला एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीचा प्रमुख म्हणून वारंवार अमेरिकेला जावं लागे. तिथे तेव्हाही शुक्रवारच्या लंच ब्रेकनंतर वीकेंड मूडला सुरुवात व्हायची आणि त्याला जोडून सुट्टी आली असेल, तर एक दिवस तयारीचा, एक दिवस पार्टी करण्याचा, एक दिवस त्या हँगओव्हरमधून बाहेर पडण्याचा आणि एक दिवस ‘चिल’ करण्याचा असं गंमतीने म्हटलं जायचं. कोविडनंतर आपलं काम आणि आपलं वैयक्तिक जीवन याकडे बघायचा जगभरातल्या नोकरदारांचा दृष्टिकोन बदललेला आढळतो. म्हणजे, वर्ष सुरू व्हायच्या आधी शनिवार-रविवारला जोडून असलेल्या सुट्या कोणत्या-कोणत्या महिन्यात आहेत, याचे एसएमएस प्रचंड मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होतात. कामावर जाऊच नये, असं खूप मोठ्या संख्येने का बरं वाटू लागलं आहे, नोकरदारांना?

लॉकडाऊनची प्रदीर्घ सुट्टी उपभोगल्यानंतरही ही भावना बळावत आहे, याचं कारण या महाभयानक अनुभवातून गेल्यानंतर ‘बदललेला जीवन दृष्टिकोन’ या विषयावर सध्या जगातल्या अनेक संस्था संशोधनात मग्न आहेत. अमेरिकेत तर कामावर जाऊ नये, असं वाटणं हा एक फार मोठा कॉर्पोरेट धोका समोर आला आहे. नोकरदार आपल्या कामावर, कंपनीवर, कार्यसंस्कृतीवर नाखूश आहेत. त्यामुळे काल-परवापर्यंत ते वीकेंड अथवा त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या शोधायचे. पण आता करिअरमधून ब्रेक घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. काहींना आपल्या करिअरचा ट्रॅक बदलायचा आहे. कोविडनंतर जीवनविषयक दृष्टी बदलल्यामुळे आहे त्या जॉबमध्ये एक प्रकारची निराशा, साचलेपण, स्थितीशिलता, बोअरडम याचा अनुभव घेतला जात आहे. कोरोनानंतर बहुतांश नोकरदार दुसरी नोकरी किंवा स्वयंरोजगाराची संधी मोठ्या प्रमाणावर शोधत आहेत. कोणा यशस्वी डॉक्टरला ऑपरेशन थिएटरऐवजी ऑपेरा थिएटरमध्ये जाऊन व्हायोलिन हाती घेऊन संगीत वाजवायचं आहे, तर गणिताच्या प्राध्यापकाला हातात खडूऐवजी कुदळ घेऊन शेती करायची आहे. कारकून म्हणून खर्डेघाशी करणाऱ्या तरुणाला आता बॉडीबिल्डिंगमध्ये भाग घ्यायचा आहे. शिक्षिकेला कथ्थक किंवा भरतनाट्यममध्ये करिअर करायचं आहे. या सर्व भावना कोरोनानंतर अधिक ठळकपणे उमटत आहेत आणि त्यातून ज्यांना शक्य आहे, ते आपल्या सध्याच्या नोकरीचा राजीनामा देत आहेत. एखादी टोळधाड यावी अथवा साथ पसरावी तसंच झालं आहे.

एकट्या अमेरिकेत एका महिन्यात ४३ लाख लोकांनी आपल्या नोकऱ्यांचे राजीनामे दिले, असं एका सर्वेक्षण संशोधनात पुढे आलं आहे. एकूण अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण तीन टक्के आहे. काम करत असलेल्यांपैकी ५० टक्के लोक दुसऱ्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वी मी एका मोठ्या कॉल सेंटरचा सीईओ होतो. कॉल सेंटर क्षेत्रात एकूण कर्मचाऱ्यांपैकी पाच ते दहा टक्के लोकांनी दर महिन्याला राजीनामा देणं, हे सर्वसामान्य होतं. या क्षेत्रात आलो तेव्हा पहिल्यांदा मला धक्काच बसला. खूप त्रास झाला. लिफ्ट चालत नाही, ने-आण करणारी गाडी एसी नाही, ऑफिसमधलं कारपेट आवडलं नाही, अशा फुटकळ कारणांवरून राजीनामे देणारे असंख्य तरुण-तरुणी मी पाहिले आहेत. त्यात पुरुषांइतक्याच महिलाही पुढे असायच्या. कँटिनमधलं जेवण आवडलं नाही म्हणून राजीनामा दिला, असे सांगणाऱ्यांची संख्या तर फारच मोठी! ज्यांचे पगार वार्षिक चार ते आठ लाख रुपयांमध्ये आहेत, त्यात राजीनामा देणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. एक तर, वय ही त्यांच्या जमेची बाजू असते आणि पर्यायांची उपलब्धता, फारशा जबाबदाऱ्या नसणं, एक बेफिकीर स्वच्छंद मनोवृत्ती यामागे असावी.

सध्या मात्र समोर येणाऱ्या राजीनामा सत्रामागची मानसिकता आणि कारणं इतकी फिल्मी नाहीत. कोविडच्या दाहक अनुभवानंतर आयुष्याविषयीची क्षणभंगुरतेची भावना वाढीला लागली असावी. ‘रॅट रेस’मध्ये पळण्यापेक्षा ‘टेक इट ईझी’ अथवा ‘बी कूल’ ही भावना बळावते आहे. त्यामुळे आयुष्य ढकलण्यापेक्षा मनापासून आवडतं तेच उपजीविका म्हणून स्वीकारण्याकडे कल वाढला आहे.

एकंदरीत आता ‘लिव्ह लाइफ किंग साईज’ किंवा ‘क्वीन साईज’ हा मंत्र प्रत्येकाला जगायचा आहे. कोविडने आम्हाला मन मारून जगायचं नाही, मनाविरुद्ध जगायचं नाही, तर मनासारखं जगायचं, हा मंत्र दिला आहे. म्हणूनच लाँग वीकेंड अथवा नोकरी बदलणं, रोजगाराचं क्षेत्रच बदलणं हा कल जगभर वाढीला लागला आहे. २५ वर्षांच्या कॉर्पोरेट अनुभवानंतर माझं असं ठाम मत झालं आहे की, लोक कंपन्या सोडत नाहीत, तर कंपनीतल्या माणसांना कंटाळून कंपन्या बदलतात. त्यामागे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, परस्परसंबंध, विकासाच्या संधी, कथित असुरक्षितता अशी अनेक कारणं आहेत. पूर्वी ढोर मेहनत करून लोक ‘बर्न आऊट’ला सामोरं जायची. कोविडनंतर मात्र या बर्न आऊटला लोक तयार नाहीत. त्यांना मनासारखं करून उपजीविका कमवायची आहे आणि ती उद्या नाही, तर आजच हवी आहे! मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे कोविड होऊन गेलेल्या अनेकांना बरं झाल्यावरही नोकरी बदलायची आहे. असं वाटणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. कदाचित कोविडमुळे झालेली शारीरिक, मानसिक, भावनिक क्षती कारणीभूत असावी.

आयुष्य एकदाच मिळतं. मग ते मनाविरुद्ध का जगा? उद्याचं कोणी पाहिलं आहे? मग जीवन जगायचं ते आजच आणि ते देखील आनंदात… ही आजची मानसिकता आहे आणि राजीनामा सत्रामागचं खरं कारणदेखील. आयुष्य ही एक रॅट रेस आहे आणि ती तुम्हाला जिंकायची आहे. कोणतीही किंमत देऊन, पडतील ते कष्ट करून ती जिंकायची भावना आता कमी झाली आहे. कोविडनंतर एक निश्चित जाणवलं आहे. तुम्ही ‘रॅट रेस’ जिंकलीत आणि अगदी पहिले आलात तरीदेखील तुम्ही एक ‘रॅट’च असता. मग असं ‘मोठा रॅट होणं कसं आवडणार? कालपर्यंत हे कळत नव्हतं, जाणवत नव्हतं. आता ते जाणवत आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

12 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

13 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

13 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

14 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

14 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

14 hours ago