हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्या अलकायदामध्ये असलेला दहशतवादी झाकीर मुसा याने भारतातील मुस्लिमांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी दिल्ली- हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्या अलकायदामध्ये असलेला दहशतवादी झाकीर मुसा याने भारतातील मुस्लिमांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुसाने एक ऑडीओ क्लिप जारी केली असून त्यामध्ये ‘भारतातील मुस्लिम सर्वात जास्त निर्लज्ज आहेत’, असे त्याने म्हटले आहे. जम्मू काश्मीरमधील दोन वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी ही माहिती दिली.
मुसाने टेलिग्राफ आणि व्हाट्सअॅप ग्रुपवर ही ऑडीओ क्लिप शेअर केली आहे. मुसाने ‘गजवा-ए-हिंद’ (भारतावर विजय मिळवण्यासाठी अखेरची लढाई)साठी जिहादमध्ये सामील होण्यास नकार देणा-या भारतीय मुस्लिमांवर टीका केली आहे.
या ऑडीओ क्लिपमध्ये त्याने कथित गोरक्षकांनी मुस्लिमाला मारहाण करत केलेली हत्या, मुस्लिम महिलेवर केलेला बलात्कार या घटनेचा उल्लेख केला आहे. भारतीय मुस्लिमांनी पीडितांच्या बाजूने आवाज न उठवल्याबद्दल मुसाने अपशब्दही वापरले आहेत.
‘आपली लढाई फक्त काश्मीरपुरती मर्यादित नसून, ही लढाई इस्लाम आणि धर्मनिंदकांमध्ये असल्याचे त्याने या ऑडीओमध्ये सांगितले आहे. ‘भारतातील मुस्लिम सर्वात जास्त निर्लज्ज आहेत. आपल्याला मुस्लिम म्हणताना त्यांना लाज वाटली पाहिजे. आमच्या बहिणींवर हात उगारला जात असताना भारतीय मुस्लिम मात्र इस्लाम शांतताप्रिय धर्म असल्याचे ओरडून सांगत आहेत. ‘जे लोक अत्याचार आणि अन्यायाविरोधात बोलू शकत नाही ते सर्व दुस-या धर्माचे आहेत. पैंगंबर आणि त्यांच्या अनुयायांकडून हिच शिकवण मिळाली आहे का? आपल्या सन्मानासाठी त्यांनी रक्त सांडले. असेही तो म्हणाला.
अजुनही तुमच्या लोकांकडे आमच्यासोबत येण्यासाठी वेळ आहे. वेळ निघून जाण्याआधी पुढे या. गोरक्षकांना इस्लाम आणि मुस्लिम धर्माची ताकद दाखवा, असे म्हणत त्याने भारतीय मुस्लिमांना भडकवण्याच्या प्रयत्न केला आहे.