भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहांच्या कंपनीतील कोटय़वधीच्या उलाढालीमुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असं सांगतानाच, या प्रकरणात जय शहा यांची पाठराखण करणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे जय यांच्या कंपनीचे सीए आहेत काय? असा संतप्त सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
पाटणा- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहांच्या कंपनीतील कोटय़वधीच्या उलाढालीमुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असं सांगतानाच, या प्रकरणात जय शहा यांची पाठराखण करणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे जय यांच्या कंपनीचे सीए आहेत काय? असा संतप्त सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
जय शहा यांच्या संपत्तीत १६ हजारपट वाढ झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत असतानाच यशवंत सिन्हा यांनीही या वादात उडी घेत स्वपक्षाच्या नेत्यांवर हल्ला चढविला आहे. जय यांची पोलखोल केल्यामुळे ‘द वायर’ या संकेतस्थळावर अब्रुनुकसानीचा दावा करणे मीडिया आणि देशाच्या हिताचे नाही. सरकारने या प्रकरणाची पूर्ण चौकशी करायला हवी, अशी मागणी सिन्हा यांनी केली.
भ्रष्टाचारावर झिरो टॉलरन्सच्या गप्पा मारणा-या भाजपने नैतिकता गमावली आहे. अतिरिक्त महाधिवक्त्यांनेही या प्रकरणावर चौकशीआधीच घाईघाईत मत मांडले. यापूर्वी असे कधी झाले नव्हते, असे सांगतानाच पीयूष गोयल ज्या पद्धतीने जयची बाजू मांडत आहेत, त्यावरून असे वाटतेय की, ते जयचे सीएच असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. नोटाबंदीवरून भाजपवर टीका करणा-या सिन्हा यांनी आता थेट पक्ष अध्यक्षाच्या मुलावरच टीका केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
‘द वायर’ या संकेतस्थळाने जय यांच्या संपत्तीची पोलखोल करणारी बातमी छापली होती. जय यांच्या ‘टेंपल एन्टरप्रायजेस’ या कंपनीला २०१५-२०१६ या वर्षात १६ हजारपट फायदा झाला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत जय यांना ८० कोटींचा नफा झाल्याचा दावा या संकेतस्थळानं केला होता. दरम्यान, या प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांने हस्तक्षेप केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच सत्ताधारी भाजपमधील नेते पक्षाची प्रतीमा या प्रकरणात मलीन झाल्याची टीका करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी शहा यांनी ‘द वायर’ या न्यूज पोर्टलवर शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यावर सुनावणीची आज तारीख होती; परंतु शहा यांचे वकील न्यायालयात हजर झाले नाही. त्यामुळे या खटल्याची सुनवानी काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली असल्याचे वायरने आपल्या न्यूज पोर्टलच्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
[EPSB]
[/EPSB]