भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेले ‘सुखोई एसयू ३०जेट’ या लढाऊ विमानाचा अपघात झाला असून त्यामधील दोन पायलटची अद्यापही माहिती मिळालेली नाही.
नवी दिल्ली- भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेले ‘सुखोई एसयू ३०जेट’ या लढाऊ विमानाचा अपघात झाला असून त्यामधील दोन पायलटची अद्यापही माहिती मिळालेली नाही. तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. हे विमान २३ मे रोजी अचानक बेपत्ता झाले होते.
भारतीय हवाई दलातील अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमानांपैकी हे एक विमान आहे. मंगळवारी नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळात ‘सुखोई एसयू ३० जेट’ लढाऊ विमान बेपत्ता झाले. आसामधील तेजपूरपासून ६० किमी अंतरावर असताना या विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता, अशी माहिती हवाई दलातील सूत्रांनी दिली होती.
मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास आसाममधील तेजपूर हवाई अड्ड्यावरून ‘सुखोई एसयू ३० जेट’या लढाऊ विमानाने दोन वैमानिकांसह नेहमीप्रमाणे उड्डाण केले. त्यानंतर सकाळी ११.३० च्या सुमारास वैमानिकांशी अखेरचा संपर्क झाला होता.
तेजपूर हवाई अड्डा चिनी सीमारेषेपासून १७२ किमी अंतरावर आहे. चीनने देखील भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता ‘सुखोई एसयू ३० जेट’ बाबत कोणतिही माहिती नसल्याचे सांगितले.