रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची सोमवारी हैदराबादमध्ये निलांबरीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
हैदराबाद- रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची सोमवारी हैदराबादमध्ये निलांबरीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सिंधूच्या विजयी रॅलीसाठी बेस्टची आन, बान, शान असलेल्या नीलांबरीला मान मिळाला.
रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे सोमवारी भारतात आगमन झाले. हैदराबाद विमानतळावर सिंधूचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारताला पदक मिळवून देणा-या या आपल्या ‘सुवर्ण’कन्येचे स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. विमानतळावरील स्वागतानंतर सिंधू आणि प्रशिक्षक गोपीचंद यांची भव्य विजयी मिरवणूकदेखील काढण्यात आली. विजयी मिरवणूक झाल्यानंतर गछिबोबली स्टेडियममध्ये तेलंगणा सरकारतर्फे सन्मान सोहळा पार पडला.
मुंबईतील बेस्टची आन, बान, शान असलेली नीलांबरी ही ओपन डबलडेकर बस पी व्ही सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी पुरवण्यात यावी, अशी विनंती तेलंगणा सरकारने बेस्ट प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार, बेस्ट प्रशासनाने सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी बस पाठवण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून रविवारी सकाळी ९ वाजता नीलांबरी हैद्राबादला रवाना झाली होती.
सिंधूला सचिनच्या हस्ते ‘बीएमडब्ल्यू’ वितरण
रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला क्रिकेटचा विक्रमवीर, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार देण्यात येणार आहे. सिंधूला कार भेट देण्याचा कार्यक्रम २७ किंवा २८ ऑगस्टला होणार आहे. याबद्दलचे वेळापत्रक आणि स्थळ लवकरच जाहिर करण्यात येईल, असे हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांनी सांगितले.
सचिन तेंडुलकरचा मित्र आणि हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांच्यातर्फे सिंधूला ही कार भेट देण्यात येणार आहे.
याआधी, सचिनच्या हस्ते लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या साईना नेहवालला बीएमडब्ल्यू कार भेट देण्यात आली होती. तसेच १९ वर्षांखालील युवा आशियाई स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद मिळविणा-या सिंधूला २०१२ मध्ये मारुती कार देण्यात आली होती.
सिंधूला मिळालेली बक्षिसे
- तेलंगणा सरकारकडून एक कोटी रुपयांचे इनाम आणि भूखंड
- दिल्ली सरकार २ कोटी रुपये
- मध्य प्रदेश सरकारकडून ५० लाख रुपये
- भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून ५० लाख रुपये
- हरियाणा सरकारकडून ५० लाख
- भारतीय फुटबॉल फेडरेशनकडून ५ लाख रुपये
- महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून सिंधूला तिच्या आवडीची कार
- सलमान खानकडून १ लाख रुपये