परळ येथील वाडिया बाल रुग्णालयात राज्याच्या कानाकोप-यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. उपचार पूर्ण होईपर्यंत लहान मुलांसह पालकांना येथेच राहावे लागते.
मुंबई- परळ येथील वाडिया बाल रुग्णालयात राज्याच्या कानाकोप-यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. उपचार पूर्ण होईपर्यंत लहान मुलांसह पालकांना येथेच राहावे लागते. यामुळे मुंबईबाहेरून येणा-या अनेक बालरुग्णांच्या पालकांची जेवणासह रात्रीच्या वेळी विश्रांतीची सोय होत नाही. त्यामुळे टपरीवर किंवा येथील रुग्णालय परिसरातील पदपथावर जेवण करून विश्रांती घेण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो.
परिणामी, सुविधांविना अशा बालरुग्णांच्या पालकांची होणारी परवड कशाप्रकारे दूर करता येईल यादृष्टीने जेरबाई वाडिया रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घेतला असून लवकरच नातेवाईकांना सुविधा पुरवली जाईल. याकरता वाडिया बाल रुग्णालयात नवीन ‘रोनाल्ड मॅकडोनाल्ड फॅमिली रूम’(आरएमएफआर) तयार करण्यात आली आहे. या स्वतंत्र खोलीत उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या पालकांना विश्रांती घेण्याची सोय असणार आहे.
काही वर्षापूर्वी दुर्गापूरहून एक दाम्पत्य आपल्या पाच वर्षाच्या मुलीला उपचारासाठी मुंबईतील वाडिया रुग्णालयात घेऊन आले. विविध उपचारानंतरही तिच्या आजाराचे निदान होत नव्हते. आर्थिक स्थिती बिकट असल्याने मुलीच्या आई-वडिलांना राहण्यासाठी घर नसल्याने ते रस्त्यावरच दिवस काढत होते. गेल्या वर्षीच या मुलीला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.
कर्करोगावर उपचारासाठी लागणारा कालावधी अधिक असतो. त्यामुळे, आधीच पैशाची चणचण असताना राहण्यासाठी निवारा नसल्याने पालकांना होणार त्रास कमी करण्यासाठी रुग्णालयातील बालकर्करोग विभागात रोनाल्ड मॅकडोनाल्ड फॅमिली रूम बनवली आहे.
या स्वतंत्र खोलीत रुग्णाच्या नातेवाईकांना आवश्यक असणा-या सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून दूरहून मुलांना उपचारासाठी आणलेल्या पालकांना काहीसा आराम मिळेल, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.
कोणत्या सुविधा असणार?
जेरबाई वाडिया रुग्णालय व आरएमएचसी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णाच्या नातेवाईकांना आराम करण्यासाठी हा विश्रामगृह सुरू केला आहे. यामुळे रुग्णालयात वारंवार ये-जा करण्याचा नातेवाईकांचा त्रास वाचणार आहे.
मॅकडोनाल्डचे पश्चिम व दक्षिण भारतातील मास्टर फ्रँचाईजी हार्डकास्टल रेस्टॉरण्ट्स प्रा. लि.ने निधी उपलब्ध करून दिला असून त्यानुसार या रुग्णालयात स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आले आहे.
या आरामदायी खोलीत आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध असणार आहे. ज्यात, आरामदायी सोफे, फ्लॅट-स्क्रीन टीव्ही, इंटरनेट अॅक्सेससह डेस्कटॉप्स, मुलांसाठी खेळण्याचे व करमणुकीचे साधन आणि शौचालय अशा सुविधांचा समावेश असेल.
‘आरएसएचसी’ म्हणजे काय
‘रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस चॅरिटीज’(आरएसएचसी) ही जगातील आघाडीची एनजीओ आहे. जी रुग्णालयातील मुलांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासह रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्थाही पुरवते. ही सोय आता जेरबाई वाडिया बाल रुग्णालयातही पुरवली जाणार आहे. रुग्णांसह नातेवाईकांनाही ही सेवा विनामूल्य पुरवली जाईल.