नगर परिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील ११ नगर परिषद निवडणुकांसाठी रविवारी ८ जानेवारीला मतदान होत आहे.
मुंबई- नगर परिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील ११ नगर परिषद निवडणुकांसाठी रविवारी ८ जानेवारीला मतदान होत आहे.
नगराध्यक्षपद ११ जागांकरता ९२ तर सदस्यांच्या २४४ जागांसाठी १ हजार १९० उमेदवारांत लढत होत आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दुस-या दिवशी ९ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १९२ नगर परिषदा व २० नगरपंचायतींसाठी चार टप्प्यांतील निवडणूक कार्यक्रमाची १७ ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती. २७ नोव्हेंबर, १४ व १८ डिसेंबर रोजी पहिल्या तीन टप्प्यांतील निवडणुका पार पडल्या.
एकूण २१२ पैकी सांगलीतील शिराळा नगरपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेस न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
चौथ्या व अंतिम टप्प्यात मतदान होत असलेल्या ११ नगर परिषदांमध्ये नागपूर जिल्ह्यातील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील २ नगर परिषदांचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी एकूण ३ लाख ८२ हजार ६० मतदार आहेत.
त्यात १ लाख ९१ हजार ७९१ पुरुष, १ लाख ९० हजार २६३ महिला व ६ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण ५०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.