व्हॅलेंटाईन दिनानिमित्त मंगळवारी मुंबईतील रस्ते, पदपथ, उद्याने, समद्रकिनारे, हॉटेल्स, कॉफीशॉप्स प्रेमीयुगुलांनी फुलून गेले होते.
मुंबई- व्हॅलेंटाईन दिनानिमित्त मंगळवारी मुंबईतील रस्ते, पदपथ, उद्याने, समद्रकिनारे, हॉटेल्स, कॉफीशॉप्स प्रेमीयुगुलांनी फुलून गेले होते. तरुण-तरुणींत ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह ओसंडून वाहत होता. कॉलेज परिसरातही मोठी गर्दी दिसत होती. तर भेटवस्तूंच्या दुकानांतही तरुण-तरुणींनीची भेटवस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.
मुंबईतील, दादर, विलेपार्ले, वांद्रे परिसरातील बाजारपेठांतही तितकाच उत्साह होता. वांद्रे पश्चिमेकडील बँडस्टँड भागात युगुलांच्या समुहांकरता खास कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. अनेक संस्थांनीही जुहू चौपाटी, मढ चौपाटी, दादर परिसरातील चौपाटीवर प्रेमीयुगुलांकरता विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तर काही राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रेमीयुगुलांसाठी खास ‘सेल्फी पॉइंट’ची उभारणी केली होती.
तर काही पक्ष या तरुण-तरुणींना हृदयाच्या आकाराच्या फुग्यांचे वाटप करताना दिसत होते. फुले विक्रेत्यांच्या दुकानांतही मोठी गर्दी झाली होती. दादरच्या फुलबाजारात दरदिवशीपेक्षा व्हॅलेंटाईन डेनिमित्त फुलांची जादा आवक होते. ही आवक यंदाही कायम होती.
खासकरून विविध रंग आणि आकारांच्या गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी होती. काहींनी तर फुलविक्रेत्यांकडे बुके आणि फुलांची आगाऊ नोंदणी केली होती. अगदी पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे फुलांचे गुच्छ विकले जात असल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.
भेटवस्तू, केक्स आणि चॉकलेट्सच्या दुकानांत विविध ऑफर्स दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी चॉकलेट्सची आगाऊ नोंदणी केल्यावर अशी चॉकलेट्स देणा-या व्यक्तीचे नाव चॉकलेट्वर आकर्षक सजावट करून टाकले जात होते.
टॅटू काढून घेणा-या पार्लरमध्येही मोठी गर्दी होती. प्रिय व्यक्तीचे नावाचा टॅटू काढण्यासाठीही झुंबड उडाली होती. मुंबईतील बोरिवली, मढ भागात सागरी सफर करण्यासाठीही युगुलांनी गर्दी केली होती. एकूणच या ‘प्रेमळ’ वातावरणामुळे पोलिसांकडूनही कायद्याचा बडगा उगारण्याचे प्रकारही कमी झाले होते.