मुंबई / निर्मिती आर्ट्सतर्फे १५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान ‘वक्रतुंड मेला २०१६’ आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनात डिझायनर गणेश आणि भारतीय हस्तकलांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. भारतीय पारंपरिक, आदिवासी आणि सांस्कृतिक कला आणि हस्तकलांसाठी निर्मिती आर्ट्स प्रख्यात आहे.
पारंपरिक भारतीय कला, हस्तकला आणि चित्रकला यांचे जतन आणि प्रसार करणे आणि आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करणे हे या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक कलाकृती एकमेवाद्वितीय आहे आणि गणपती विविध स्वरूपात साकारण्यात आला असून त्याद्वारे देशातील संस्कृती व कला यांचे दर्शन घडविण्यात आले आहे.
वाद्य वाजविणारा गणेश, बाराखडी शिकणारा गणपती, गणेश की होल्डर, वॉलहँगिंग, विविध भाव दर्शविणारा गणपतीचा चेहरा, गणपतीचे चित्र असलेले भिंतीवरील घडय़ाळ, पावसाळ्याच्या सफरीवर निघालेला गणपती, भाजी विक्रेत्याच्या रूपातील गणपती, वारलीपेंटिंग असलेले भिंतीवरील घडय़ाळ, वॉलहँगिंग्स, घंटा इत्यादी कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा खास गणेशोत्सवात लावता येतील अशा वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत.
या कलाकारांकडे असलेली कौशल्ये हा त्यांचा पिढीजात वारसा आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी काय गरजेचे आहे, हे त्यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच पारंपरिक कलेचा गाभा जपत नव्या ग्राहकांना आवडतील अशा प्रकारच्या संकल्पना राबवत त्यांनी नावीन्यपूर्ण डिझाइन्स तयार केली आहे.
निर्मिती आर्ट्सचे संस्थापक सुरेंद्र खजांची म्हणतात, ‘प्रत्येक ललाकृती ही कलाकाराच्या भावनेची प्रतीक असते. आमच्या कलाकारांनी पर्यावरणस्नेही पदार्थापासून गणपतीची मूर्ती घडविली आहे. त्यासाठी त्यांनी कागदाचा लगदा, टेराकोटा, करवंटी इत्यादींचा वापर केला आहे.
या मूर्तीना नसर्गिक रंगांनी रंग दिला आहे. कला उपासकांसाठी आणि रसिकांसाठी १००१ हून अधिक गणेशमूर्ती आम्ही सादर केल्या आहेत. यामूर्ती आणि इतर कलाकृती विविध सणांच्या दिवशी लावून तुम्ही तुमचे घर सजवू शकता.’
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे महत्त्व व भारतीय आदिवासी कलेविषयी कला उपासक आणि भाविकांमध्ये प्रचार व्हावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गणेशोत्सव हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य अंग आहे आणि समकालीन कलेच्या माध्यमातून निर्मितीने ते साजरा करण्याचे ठरविले आहे, अशी पुष्टी खजांची यांनी जोडली.