तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला या मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसून त्या पक्षातील सर्वोच्च पदासाठीही योग्य नसल्याचे म्हणत एआयडीएमकेच्या नेतेमंडळींनीच त्यांना विरोध सुरू केला आहे.
चेन्नई- तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला या मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसून त्या पक्षातील सर्वोच्च पदासाठीही योग्य नसल्याचे म्हणत एआयडीएमकेच्या नेतेमंडळींनीच त्यांना विरोध सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारी होऊ न शकलेला शशिकला यांचा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या सरचिटणीस जयललिता यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणा-या शशिकला यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले होते. यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदही द्यावे असा एक मतप्रवाह तयार झाला होता.
रविवारी एआयडीएमकेच्या आमदारांनी एकमताने त्यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली होती. त्यावेळी मंगळवारी त्यांचा शपथविधी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र प्रत्यक्षात त्यांचा शपथविधी झालाच नाही.
दुसरीकडे एआयडीएमकेचे ज्येष्ठ नेते ची. एच. पांडियन यांनी जयललितांच्या मृत्यूवरच संशय व्यक्त केला, यामागे कटकारस्थान असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यानंतर ७५ दिवसांनी ५ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. ज्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यादिवशी शशिकला आणि जयललिता यांच्यात जोरदार भांडण झाले होते. यात जयललिता यांना धक्का देऊन पाडण्यात आले आणि त्या बेशुद्ध झाल्या, असा आरोप पांडियन यांनी केला आहे.
शिवाय शशिकला यांना मुख्यमंत्री पद देण्यासही त्यांनी विरोध केला आहे. शशिकला या मुख्यमंत्रीपदाच्या आणि पक्षाच्या सर्वोच्च नेतेपदाच्याही लायक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पांडियन हे तामिळनाडू विधानसभेचे माजी अध्यक्ष असून त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या या आरोपांनंतर तामिळनाडूत खळबळ माजली आहे.