अमेरिकेने पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे मात्र त्यासाठी पाकिस्तानसमोर एक अट ठेवली आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेने पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे मात्र त्यासाठी पाकिस्तानसमोर एक अट ठेवली आहे. दहशतवादी संघटनांचा बीमोड केला तरच ही मदत पाकला मिळेल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सांगितले आहे.
अमेरिकेने २००२ पासून आतापर्यंत पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सहाय्य केले आहे. परंतु पाकिस्तानचा हक्कानी नेटवर्कला असलेला छुपा पाठिंबा लक्षात आल्यानंतर हा मदतीचा ओघ कमी झाला आहे.
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक सहाय्याच्या बळावर अमेरिकेच्याच सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरायचे, असा हा पाकिस्तानचा एकूण प्रकार होता. त्याला चाप लावण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन करत आहे.
अफगाणिस्तानात हल्ले करणा-या देशांतर्गत दहशतवादी संघटनांवर कारवाई केली तरच २५५ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत मिळेल, असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ही माहिती काँग्रेसला दिली आहे.
पाकिस्तानला आपण अब्जावदी डॉलर्स देतो आणि आपण ज्यांच्याशी लढतोय, त्यांना पाकिस्तान संरक्षण देते, असा आरोप ट्रम्प यांनी केला. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कारवाई करायला हवी आणि त्यानंतरच त्यांना सहाय्य करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.