राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हाधिका-यांमार्फत विविध सरकारी आस्थापनांमधून कर्मचा-यांची यादी प्राप्त करून महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे.
भिवंडी- ठाणे महापालिकेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हाधिका-यांमार्फत विविध सरकारी आस्थापनांमधून कर्मचा-यांची यादी प्राप्त करून महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे.
मात्र भिवंडी महापालिकेचे आस्थापना प्रमुख नितीन पाटील यांनी पालिकेतील स्मशानभूमी कर्मचारी, साफसफाई, बगीचा कर्मचारी, शिपाई या चतुर्थ श्रेणीतील ७० कामगारांच्या नावांची यादी परस्पर ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिका-यांना सादर केली आहे. या कामगारांना यादीत वर्ग १ आणि २ चे कर्मचारी असल्याचे कळवण्यात आले आहे. या कर्मचा-यांवर निवडणुकीतील महत्त्वाची जबाबदारी दिल्यास मतदानाच्या ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या पदांवर नियुक्त केले आहे. तसेच याच वर्गवारीतील कर्मचा-यांची नियुक्ती उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठीही केल्याची माहिती आहे. भिवंडी महापालिकेतील सुमारे २०० चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांना थेट मतदान अधिकारी नेमण्यात आले आहे.
प्राप्त कर्मचा-यांच्या यादीनुसार निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी ६ फेब्रुवारीला ठाणे येथे हजर राहण्याच्या लेखी सूचना मिळाल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. निवडणुकीच्या कामकाजाची काहीही माहिती नसल्याने पालिका आस्थापनेच्या स्मशानभूमी, सफाई, शिपाई, बगीचा आदी कामांवरील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
या पदांवर काम करत असलेले कर्मचारी प्रदीप जाबरे, दिगंबर चौधरी, प्रफुल तांबे, उदय काठवले, मूलचंद जाधव, पांडव, नरेश काठवले आदींसह ७० कर्मचा-यांनी ठाणे आयुक्तालयात धाव घेऊन निवडणुकीच्या कामकाजाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे लेखी स्पष्ट केले आहे.
परंतु निवडणुकीची तारीख जवळ आल्याने ऐनवेळी सक्षम कर्मचारी कोठून आणायचे? असा सवालही निवडणूक अधिका-यांना पडला आहे. भिवंडी महापालिकेकडून चुकीच्या वर्गवारीतील कर्मचा-यांची यादी पुरवल्याने संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत ठाणे महापालिकेच्या अधिका-यांकडून मिळाले आहेत.