जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे लष्कराच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करून त्यांची शस्त्रे पळवून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे लष्कराच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करून त्यांची शस्त्रे पळवून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. टीव्ही टॉवरच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-यांवर हल्ला करत हे दहशतवादी त्यांच्या पाच बंदुका घेऊन फरार झाले.
काश्मीर खो-यात दहशतवाद्यांकडून अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही अनेकदा केले आहेत. यापूर्वी पुलवामाच्या तुमलहाल गावावर दहशतवाद्यांनी हल्ला करून त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांच्या रायफल पळवून नेल्या होत्या. हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हान वाणीला ठार केल्यानंतर आतापर्यंत या प्रकारच्या २७ घटना घडल्या आहेत.
एका पोलीस अधिका-याने सांगितले की, लष्कराच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अनंतनाग जिलतील दालवश परिसरातील एका टीव्ही टॉवरच्या गार्डरूममध्ये घुसून टॉवरच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या भारतीय राखीव दलाच्या पोलिसांकडून तीन एसएलआर रायफल, एक कार्बाईन रायफल आणि एक इन्सास रायफल अशा पाच बंदुका पळवून नेल्या.
या फरार झालेल्या दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून सुरक्षा दलांना अॅलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर एका अन्य घटनेत दहशतवाद्याकडून पुलवामा जिलतील सिरनू भागातील अल्पसंख्य समाजाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस चौकीवर रविवारी रात्री उशिरापर्यंत गोळीबार केला.
मात्र पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी पळून गेले. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिका-याने सांगितले.