जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपासून सुरू असणा-या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या कारवाईत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला.
जम्मू- जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपासून सुरू असणा-या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या कारवाईत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला. यासोबतच यात भारतीय लष्कराचे तिघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका मेजर पदावरील अधिक-याचादेखील समावेश आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईत पोलिसांचाही सहभाग होता.
लष्कराने जम्मू काश्मीरमधील त्राल गावात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर रात्रीच हा परिसर ताब्यात घेतला. लष्कर आणि पोलिसांकडून या परिसरात शनिवारी रात्रीपासूनच शोध मोहिम राबवण्यात येत होती. दहशतवाद्यांकडून लष्करावर गोळीबार करण्यात येत होता. त्याचवेळी स्थानिकांनी लष्कराच्या जवानांवर दगडफेक करण्यास सुरवात केली.
दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहिम राबवत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर स्थानिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी स्थानिकांनी जवानांच्या बंदुका हिसकावून घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दहशतवाद्यांच्या गोळीबाराला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून तीव्र गोळीबार करण्यात आला. त्यामुळे लष्कराकडून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. यानंतर ४२ राष्ट्रीय रायफल्सकडून परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांचादेखील या कारवाईत सहभाग होता.