टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील १२ ठिकाणी बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली.
श्रीनगर- टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील १२ ठिकाणी बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली. यामध्ये दोन व्यापारी आणि हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित एका फुटीरतावादी नेत्याचाही समावेश आहे. त्यांना कोणत्याही क्षणी चौकशीसाठी बोलविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी येथील स्थानिक नेत्यांना पाकिस्तानातून पैसा पुरविला जातो. या पैशातून दहशतवादी कारवाया केल्या जातात. अशा फुटीरतावादी नेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएने गेल्या काही महिन्यापासून कंबर कसली आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर, हंदवाडा, कुंजर आणि बारामुल्लासहित १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
कुंजर येथील हुर्रियतचा फुटीरतावादी नेता जुहूर वतालीच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी मारण्यात आल्या. श्रीनगरमध्ये दोन व्यापा-यांच्या घरावर छापे मारण्यात आले. त्याशिवाय सैयद अली शाद गिलानी याच्या हालचालीवर एनआयएने लक्ष केंद्रीत केले आहे.
गिलानीने काश्मीरमध्ये दगडफेक करण्याचे आणि शाळा तसेच सरकारी इमारती जाळण्याचे आदेश दिले होते. काश्मीरमधील प्रत्येक दंगलीत गिलानीचा हात असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्याची लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
एनआयएने आतापर्यंत ७ फुटीरतावादी नेत्यांना अटक केली आहे. त्यात गिलानीचे जावई अल्ताफ अहमद शाह ‘फंटूश’चाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांसाठी गिलानीच्या घरातूनच फंडिंग होत असल्याची कबुली या सातही जणांनी दिली आहे. शिवाय गिलानीचे घर म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचेही तपासात समोर आले आहे.