अमेरिकेच्या कर विभागाने तेथील नागरिकांना खोटया आणि फसव्या कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते.
ठाणे- अमेरिकेच्या कर विभागाने तेथील नागरिकांना खोटया आणि फसव्या कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. अमेरिकन रेव्हेन्यू सर्व्हिस (आयआरएस) कुणालाही कॉल करुन कारवाईच्या धमक्या देत नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र तरीही अमेरिकन नागरिक या कॉल्सच्या जाळयात फसले आणि यातूनच तीन वर्षात त्यांची सुमारे २६.५० कोटी अमेरिकन डॉलर्सची फसवणूक झाल्याचे बनावट कॉल सेंटर प्रकरणात समोर आले आहे.
हा आकडा भारतीय चलनात सुमारे १७६० कोटींच्याही पुढे जात असून त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे.
अमेरिकन कर विभागाने यंदाच्या जानेवारी महिन्यात नागरिकांना सावध केले होते. मात्र तरीही नागरिक या कॉल्सना भुलले. भारतातील या बनावट कॉल सेंटर्सच्या माध्यमातून मागील ३ वर्षात ८ लाख ९६ हजार अमेरिकन नागरिकांना फोन करण्यात आले.
त्यापैकी ५ हजार नागरिक या कॉल्सच्या जाळयात सापडले आणि त्यातून तब्बल २६.५ कोटी अमेरिकन डॉलर्सची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे अमेरिकन नागरिक जर वेळीच सावध झाले असते, तर त्यांना इतका मोठा गंडा घातला गेला नसता, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.
‘त्या’ आरोपींना कोठडी
दरम्यान, मीरा रोड येथे मागील आठवडयात धाडी टाकून ठाणे गुन्हे शाखेने अटक केलेल्या ७२ जणांना कोठडी सुनावण्यात आली आहे. ७२ पैकी १३ जणांना १४ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी आणि उर्वरित ५९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.