हॉटेलच्या लिफ्टमध्ये सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ‘तहलका’चे संस्थापक आणि माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याच्यावर गुरुवारी गोव्यातील म्हापसा सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले.
पणजी- हॉटेलच्या लिफ्टमध्ये सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ‘तहलका’चे संस्थापक आणि माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याच्यावर गुरुवारी गोव्यातील म्हापसा सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
२०१३ मध्ये ही घटना घडली होती. गोव्यात आयोजित थिंक फेस्टदरम्यान एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्या सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर पीडीत महिलेने आपल्या वरिष्ठ सहकारी महिलेला या घटनेची कल्पना दिली होती.
त्यावेळी मीडियात पीडिता, तेजपाल आणि तहलकाच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांच्यात ई-मेलच्या माध्यमातून झालेला संवादही प्रसिद्ध झाला होता. नंतर रितसर तक्रार होऊन तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, तेजपाल यांनी आपल्याविरोधातील आरोप हटवण्यात यावेत अशी मागणी म्हापसा सत्र न्यायालयाकडे केली होती.