सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी दिल्लीतील दिनदयाल उपाध्याय मार्गावर मारहाण करण्यात आली.
नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी दिल्लीतील दिनदयाल उपाध्याय मार्गावर मारहाण करण्यात आली. स्वामी अग्निवेश हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओत तरुणांचा घोळका अग्निवेश यांना मारहाण करताना दिसत आहे.
स्वामी अग्निवेश यांना गेल्या महिन्यात झारखंडमधील पाकूर भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अग्निवेश यांनी गोमांस खाण्याच्या समर्थनार्थ तसेच नक्षलवादासंदर्भात केलेल्या विधानांमुळे भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता.
झारखंडमधील घटनेनंतर स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. शुक्रवारी अग्निवेश हे दिल्लीत वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते. दिल्लीतील दिनदयाल मार्गावरुन जात असताना त्यांना काही तरुणांनी मारहाण केली. यातील व्हिडिओत एक महिला देखील अग्निवेश यांना मारहाण करत असताना दिसत आहे. अग्निवेश परत जा, अशा घोषणा या तरुणांनी दिल्या.