मुंबईत रस्ते विकासासाठी मागील तीन वर्षात साडेसहा ते सात कोटी रुपये खर्च केल्यानंतरही खड्डयांचे प्रमाण कमी झालेले नाही.
मुंबई- मुंबईत रस्ते विकासासाठी मागील तीन वर्षात साडेसहा ते सात कोटी रुपये खर्च केल्यानंतरही खड्डयांचे प्रमाण कमी झालेले नाही. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या दाव्यांवरही पाणी फेरले गेले असून शहरातील रस्त्यांची अनेक ठिकाणी चाळणी झाली आहे.
महापालिकेच्या रस्त्यांवर खड्डयांची रांगोळी असताना फक्त ५० ते ६० खड्डे असल्याचा दावा दररोज पालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे किती व कोणाचे? याचा भांडाफोड ‘स्वाभिमान’ करणार असून शहराच्या विविध भागांतील खड्डयांचे दर्शन मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मंगळवार १२ जुलै रोजी आयोजित चित्रप्रदर्शनातून घडणार आहे.
हे प्रदर्शन आवर्जून पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांना ‘स्वाभिमान’तर्फे खास निमंत्रणही पाठवण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.
मुंबईतील एक हजारांहून अधिक रस्त्यांच्या विकासासाठी साडेसात कोटींचा आराखडा तयार करून विकास करण्यात आला. परंतु या रस्ते कामांतील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर पोलिसांत कंत्राटदारांच्या कामगारांचे व अधिका-यांचे अटक सत्र सुरूच आहे. मात्र दुसरीकडे या रस्ते विकासामुळे खड्डयांचे प्रमाण कमी होण्याऐवजी यंदाही खड्डयांची समस्या कायम आहे.
आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांनी केलेले दावे या पावसात वाहून गेले आहेत. महापालिकेतील सत्ताधा-यांच्या रस्ते कामांतील भ्रष्टाचाराचे हे खड्डे असून या सर्व खड्डयांची छायाचित्रे टिपून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेची पोलखोल केली आहे. यासाठी ‘स्वाभिमान’ने खड्डे मोजा मोहीमही हाती घेतली आहे. याअंतर्गत विविध भागांतील रस्त्यांवर खड्डयांची छायाचित्रं ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी टिपली आहेत.
स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या मोहिमेंतर्गत काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन १२ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वासाठी खुले राहणार आहे.
या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर स्नेहल आंबेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना निमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती युवा आमदार नितेश राणे यांनी दिली.
महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असल्याने मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांची नेमकी स्थिती काय, हे संपूर्ण मुंबई फिरूनही पाहता येणार नाही. त्यासाठी एकाच ठिकाणी खड्डयांचे सचित्र दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न आहे.
उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत. महापालिकेत त्यांच्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याजवळ किती खोटे बोलतात हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहेच. एक छायाचित्रकार म्हणून या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी खड्डयांची छायाचित्रे काढणा-यांचे कौतुक करावे, हाही हेतू आहे.
– नितेश राणे, स्वाभिमान संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व युवा आमदार