कुंडल्या काढायला, तुम्ही मुख्यमंत्री आहात की ज्योतिषी आहात? अशा खणखणीत शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना खडसावले.
मुंबई- महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यापासून सर्वसामान्य माणसांची कोणतीही कामे होत नाही. मुख्यमंत्री लोकांची कामे करण्याऐवजी विरोधकांना ‘तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत’ म्हणून धमकावत आहेत. कुंडल्या काढायला, तुम्ही मुख्यमंत्री आहात की ज्योतिषी आहात? अशा खणखणीत शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना खडसावले. भाजपाने सुडाचे राजकारण सुरू केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांनी झंझावाती दौरा सुरू केला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. शुक्रवारी जळगाव येथे झालेल्या केळी आणि कापूस उत्पादक शेतक-यांच्या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा आपले लक्ष बनविले. त्या म्हणाल्या की, सध्याचे जग वाय-फाय आणि डिजिटलचे आहे. तरीही आमचे मुख्यमंत्री कुंडल्यांची भाषा करतात. तुम्ही मुख्यमंत्री आहात, ज्योतीषी नाही याची जाणीव ठेवा. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा. परंतु ते प्रश्न सोडविण्यापेक्षा सूडाचे राजकारण करू पहात आहेत. खरं तर महाराष्ट्राला एक परिपक्व राजकीय वारसा आहे. शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय विचार वेगळे होते. त्यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यांनी एकमेकांवर अनेकदा जोरदार टीकाही केली होती. मात्र त्यांनी सूडाचे राजकारण कधी केले नाही याची आठवणही सुप्रिया सुळे यांनी करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढवताना खासदार सुळे म्हणाल्या की, आणीबाणीनंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्या दुप्पटीने मते घेऊन पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. त्यामुळे मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी यश मिळालेले असले तरी भविष्यात नव्या जिद्दीने कामाला लागा, यश तुमच्या मागे धावत येईल.
भाजपाच्या जिव्हारी घाव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुप्रिया सुळे यांच्याकडून होणा-या टीकेने भाजपामध्ये अस्वस्थता पसरली असून आता मुख्यमंत्र्यांच्या मदतीला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी धावून आले आहेत. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपले स्थान बळकट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आरोप करीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. भांडारी यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षासाठीचे प्रॉक्झी वॉर आहे. त्यांनी अशा रितीने मुख्यमंत्र्यांच्या आडून वार करण्याच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्यासाठी आपल्या स्पर्धकांवर थेट हल्ला करावा.