मुंबई- राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली.
ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मलबार हिल येथे घडली. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. मन्मथ म्हैसकर (२२) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत तर, मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. त्यांचा मुलगा मन्मथ हा मित्राला भेटायला चाललो असे सांगून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. त्याने साडेसात वाजण्याच्या सुमारास मलबार हिलमधील दरिया महल इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र मन्मथचा जागीच मृत्यू झाला होता.
सायंकाळी चंदनवाडी स्मशानभूमी येथील विद्यूतदाहिनीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मलबार हिल पोलिसांनी चौकशीसाठी मन्मथच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही आत्महत्या होती की अपघाती मृत्यू यादृष्टीनेही तपास केला जात आहे.