बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरात रुग्णालयात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६८ ठार तर ५० जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये बहुतांशी वकिलांचा समावेश आहे.
कराची- बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरात रुग्णालयात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६८ ठार तर ५० जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये बहुतांशी वकिलांचा समावेश आहे.
क्वेट्टा शहरातील मेंगल चौकात बलुचिस्तान बार असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अन्वर काझी यांच्यावर अज्ञान हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांचा मृतदेह रुग्णालयात आणल्यावर तेथे भीषण बॉम्बस्फोट झाला. यात ६८ जण ठार तर ५० जण जखमी झाले. मृत व जखमींमध्ये बहुतांशी वकिलांचा समावेश आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफर्राज बुग्ती म्हणाले की, सुरक्षा व्यवस्थेत त्रूटी राहिल्याने हा स्फोट झाला. या स्फोटाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. हा स्फोट आत्मघातकी दहशतवाद्याने घडवला असावा असा अंदाज आहे. या स्फोटानंतर रुग्णालयात एकच गोंधळ माजला. क्वेट्टा शहरातील सर्वच रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली. या स्फोटानंतर सीमावर्ती भागातील सैनिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो भाग सील केला.
या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. बलुचिस्तानची सीमा इराण व अफगाणिस्तानला लागून आहे. त्यामुळे अनेक दहशतवादी हल्ले या भागात होत असतात.