शिवाजी पार्क येथील २६ जानेवारीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
मुंबई- कृषी विभागाचा दुष्काळग्रस्त गावाचा देखावा, सांस्कृतिक विभागाचे पंढरपूर वारी दर्शन असे एकापेक्षा एक सरस चित्ररथांमुळे मुंबईकरांचे आर्कषण ठरलेल्या शिवाजी पार्क येथील २६ जानेवारीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि ७३ व ७४ व्या राज्यघटना दुरुस्तीला २५ वर्षे होत असल्याच्या निमित्ताने आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच संचलनात समावेश केला जाणार आहे. त्या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे अनावरण बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते करण्यात आले.
बुधवारी आयोगाच्या कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, सर ज.जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय बोंदर आदींच्या उपस्थितीत प्रतिकृती अनावरण कार्यक्रम संपन्न झाला.
७३ व ७४व्या घटना दुरुस्तीमुळें स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचीही स्थापना करण्यात आली. शिवाय आता मुंबईसह १० महानगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २९६ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात आल्याचे सहारिया यांनी सांगितले.
या चित्ररथाची संकल्पना सर जे.जी. कला महाविद्यालयाची असून तेच त्याची निर्मिती करणार आहेत. चित्ररथाच्या प्रथमदर्शनी भागावर उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प असेल. ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतले आहे.
चित्ररथाच्या मध्यभागी महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधिक स्वरूपात इमारती दर्शविल्या जातील. चित्ररथावर मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा जिवंत देखावाही असेल. चित्ररथाच्या मागील बाजूस मोठा एलईडी पडदा असेल. त्यावर मतदार जागृतीसंदर्भातील घोषवाक्य, पोस्टर्स, चित्रे, ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येणार आहेत.