या आठवडय़ात पहिल्या दिवशी देखील शेअर बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले. सोमवारच्या सत्रात झालेल्या कामकाजात निर्देशांक निफ्टीने यापूर्वीचा आपला मागील उच्चांक तोडत नवीन उच्चांक नोंदविला. तेजीचे हे वातावरण संपूर्ण दिवसभर कायम राहिल्याने सोमवारी निफ्टी ही आपल्या यापूर्वीच्या मागील उच्चांकाच्या वर जाऊन बंद झाली. त्यानंतर मात्र पुढील तीन सत्रांत निर्देशांक दबावात राहिले. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये झालेल्या घसरणीमुळे आणि नफा वसुलीच्या परिणामी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी निर्देशांकात घसरण झाली.
राष्ट्रीय निर्देशांक निफ्टीने यापूर्वी २ ऑगस्ट २०१७ ला १०१३८ हा उच्चांक नोंदविलेला होता. या आठवडय़ात तेजी झालेली असली तरी या आठवडय़ाच्या संपूर्ण तेजीत निर्देशांक सेन्सेक्सला मात्र आपला यापूर्वीचा उच्चांक तोडता आलेला नाही ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. सेन्सेक्सने २ ऑगस्टला ३२६८६ हा उच्चांक नोंदविलेला होता. एकीकडे निफ्टी नवीन उच्चांक नोंदवत तेजीच्या लाटेवर स्वार झालेली असताना या तेजीच्या लाटेतच ‘डिक्सन टेक्नोलॉजी’ या कंपनीचे लिस्टिंग झाले. प्रारंभिक मार्केटला गुंतवणूकदारांकडून या आय.पी.ओ.ला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. प्रारंभिक मार्केटला ‘डिक्सन टेक्नोलॉजी’ या शेअर्सची मागणी करण्यासाठी १७६० ते १७६६ हा किंमत पट्टा होता.
सोमवारी दमदार लिस्टिंग होत हा शेअर २७२५ रुपये किमतीला खुला झाला. प्रारंभिक किंमत पट्टय़ाच्या तुलनेत तब्बल ५४ टक्क्य़ांची वाढ या शेअरला मिळाली. या दमदार सुरुवातीनंतर देखील या शेअर्समधील तेजी अशीच टिकून राहिल्याने ‘डिक्सन टेक्नोलॉजी’ने ३०२४ हा उच्चांक नोंदविला. उच्चांकाचा विचार करता लिस्टिंग दिवशीच या शेअरमध्ये जवळपास एकूण ७१ टक्क्यांची महावाढ झाली.
एकीकडे डिक्सनसारख्या कंपनीची दमदार नोंदणी झालेली असताना या आठवडय़ात गुरुवारी लिस्टिंग झालेल्या ‘मॅट्रिमोनी डॉट कॉम’ या कंपनीने मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. प्रारंभिक मार्केटला या कंपनीच्या शेअर्सची मागणी ९८३ ते ९८५ या किमतीच्या पट्टय़ात करावयाची होती. लिस्टिंग दिवशी मात्र हा शेअर प्रारंभिक किंमत पट्टय़ाजवळच म्हणजे ९८५ रुपये किमतीलाच खुला झाला. या शेअरमधून गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेन मिळाला नाही. याउलट लिस्टिंगनंतर हा शेअर जवळपास ९ टक्क्यांची घसरण होत बंद झाला.
या आठवडय़ात मेटल आणि बँकिंग क्षेत्रामध्ये घसरण झाली. त्याचवेळी गेले कित्येक महिने मंदीच्या छायेत असलेले आणि या वर्षी शेअर बाजारात झालेल्या महातेजीत आपला सहभाग दिलेला नसलेले क्षेत्र म्हणजे ‘फार्मा’ अर्थात ‘औषधी निर्माण क्षेत्र’ यामध्ये या आठवडय़ात तेजीचे वातावरण राहिले. या क्षेत्रातील विविमेड लॅब, सिप्ला, डॉरेड्डी, डिविस लॅब, इप्का लॅब या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून आली. आता डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेल्या घसरणीचा फायदादेखील फार्मा क्षेत्राला होईल.
शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा आणि गती मंदीची झालेली आहे. जोपर्यंत निर्देशांक निफ्टी १०१७९ या पातळीच्या खाली आहे, तोपर्यंत आता निर्देशांकात फार मोठी वाढ होणार नाही.
टेक्निकल चार्टनुसार सिप्ला, एशियन पेंट्स, अजंठा फार्मा, भारत फोर्ज यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे, तर टाटा इलेक्सी, अपोलो हॉस्पिटल, झेन्सार टेक्नोलॉजी यासह अनेक शेअर्सची दिशा मंदीची आहे. फार्मा क्षेत्रातील ‘सनफार्मा’ या शेअरमध्ये अल्पमुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी रचना तयार झालेली असून आता जोपर्यंत ‘सनफार्मा’ हा शेअर ५०३ रुपये या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र शुक्रवारी निर्देशांकात झालेल्या मोठय़ा घसरणीनंतर निर्देशांकाची दिशा आणि गती मंदीची झालेली असल्याने, जोपर्यंत निर्देशांकाची दिशा आणि गती तेजीची होत नाही, तोपर्यंत तेजीची दिशा असणा-या शेअर्समध्ये नव्याने खरेदी करण्यासाठी संयम राखणेच योग्य ठरेल.
करन्सी मार्केटचा विचार करता मागील काही आठवडे डॉलर एका मर्यादित पातळीत होता. या आठवडय़ात मात्र डॉलर ६४.४० ही पातळी तोडून रेंज बाऊंड अवस्थेतून बाहेर पडलेला आहे. त्यामुळे अल्पमुदतीच्या चार्टनुसार आता जोपर्यंत डॉलर ६४ रुपये किमतीच्या वर टिकून आहे, तोपर्यंत डॉलरमध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.
कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून जोपर्यंत सोने २८७७७ या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोने या धातूमधील तेजी टिकून राहील. अल्पमुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची ३१५० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. बेस मेटल्समध्ये गेल्या काही महिन्यात जोरदार वाढ झालेली होती. आता मात्र या आठवडय़ात बेस मेटल्सच्या तेजीला लगाम लागलेला आहे.
यापूर्वीच्या लेखमालेत सांगितल्यानुसार फंडामेंटल अॅनालिसिसनुसार निर्देशांकाची व्हॅल्यू खूप जास्त आहे. निर्देशांकाचा पी ई रेशो २६ च्या वर गेलेला आहे. अशा परिस्थितीत निर्देशांकानी पुढील काळात जर मध्यम मुदतीच्या चार्टमधील आपापल्या खरेदीच्या पातळ्या तोडल्या तर गेल्या काही महिन्यात झालेल्या महातेजीच्या करेक्शनला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे शेअर बाजारात यापुढे गुंतवणूक करीत असताना टेक्निकल आणि फंडामेंटल बाबींची योग्य सांगड घालून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सध्या चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी या देखील अत्यंत महत्त्वाच्या राहतील.
(टीप : मागील लेखात ‘एसबीआय लाइफ’ या आय.पी.ओ चा प्रारंभिक मागणी पट्टा ६८५ ते ७०० ऐवजी छपाईच्या तांत्रिक चुकीमुळे ९८५ ते ७०० असा छापला गेला होता याची वाचकांनी नोंद घ्यावी.)
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवीत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)
[EPSB]