रासपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तरादाखल पुण्यातील बारामती हॉस्टेलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.
पुणे- सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय समाज पक्षा(रासप)च्या कार्यालयाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर रासपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तरादाखल पुण्यातील बारामती हॉस्टेलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि रासपचे कार्यकत्रे पोलीस ठाण्यासमोरच एकमेकांना भिडले. बारामती हॉस्टेल हे शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे आहे.
बुधवारी दुपारी रासपचे चार कार्यकत्रे शरद पवार अध्यक्ष असलेल्या सेनापती बापट रस्त्यावरील विद्या प्रतिष्ठानच्या बारामती हॉस्टेलमध्ये घुसले. या वेळी समोरच लावलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिमांवर सोबत आणलेली शाई फेकण्याचा प्रयत्न करत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली.
तसेच मंगळवारी सायंकाळी सिंहगड रस्त्यावरील महादेव जानकर यांचे कार्यालय फोडलेल्या कृत्याचा निषेध केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी रासपच्या कार्यकर्त्यांना पकडून जवळच असलेल्या जनवाडी पोलीस चौकीत नेऊन, पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या तरुणांना अटक केली आहे.
‘जानकारांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असून त्यांनी जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांनी केली आहे. तसेच जानकर यांनी माफी मागितली नाही, तर हे आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
भगवानगडावर मंगळवारी महादेव जानकार यांनी पवार कुटुंबाला लक्ष्य करत बारामती उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे विधान केले होते. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
महादेव जानकर यांच्या सिंहगड रस्त्यावरील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह दहा कार्यकर्त्यांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रासपने जबाबदारी स्वीकारली!
शाईफेक प्रकरणाची जबाबदारी रासपचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांनी स्वीकारली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने न जाता पक्ष कार्यालयाचे नुकसान केले आहे. त्या प्रत्युत्तरादाखल आपण हे कृत्य केले आहे. भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही ‘रासप’च्या वतीने देण्यात
आला आहे.
राष्ट्रवादीकडून जानकरांचा निषेध
महादेव जानकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून टिळक पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. जानकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने सिंहगड रस्त्यावरील कार्यालयाची तोडफोड केली होती. तर बुधवारी दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून टिळक पुतळ्यासमोर तीव्र निषेध करण्यात आला.