तेलाचे भाव वधारल्याने गेले सहा दिवस घसरणारा सेन्सेक्स मंगळवारी १९६ अंकांनी वधारला.
मुंबई- गेले सहा दिवस घसरणारा सेन्सेक्स मंगळवारी १९६ अंकांनी वधारला. बाजारात धातू, बांधकाम, वाहन, ऊर्जा क्षेत्राच्या कंपन्यांच्या समभागांना मागणी होती.
तेलाचे भाव वधारल्याने अमेरिकेतील शेअर बाजार वधारला. तसेच सरकारने नोटाबंदीबाबत अनेक निकष शिथील केले. त्यामुळे शेतक-यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण पसरले होते, असे जिओजित बीएनपी परिबाज फायनान्शियल सव्र्हिसेसचे मुख्य बाजार धोरणकर्ते आनंद जेम्स यांनी सांगितले. नोटाबंदीचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. डॉलर्सच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे. गेल्या नऊ महिन्याचा रुपयाचा नीच्चांक ६८.२५ रुपये नोंदला गेला.
सेन्सेक्स सकाळी २५९२८ वर उघडला. दिवसभरात तो २६०३९ ते २५७६५ दरम्यान फिरत राहिला. दिवसअखेर तो १९५.६४ ने वधारून २५९६०.७८ वर बंद झाला. गेल्या सहा दिवसांत सेन्सेक्स १७५२.५४ ने घसरला आहे. निफ्टी ७३.२० अंकांनी वधारून ८००२.३० वर बंद झाला. परदेशी वित्तसंस्थांनी सोमवारी १३१०.८२ कोटी रुपयांचे समभाग विकले. अमेरिकन शेअर बाजारात तेजी आल्याने आशियाई बाजारात तेजीचे वारे होते. जपानमध्ये भूकंप आल्याने गुंतवणूकदार सतर्क झाले. चीन, जपान, हॉँगकॉँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया व तैवानमध्ये बाजार वधारले.
मारुती, बजाज ऑटो, हिंदुस्थान युनिलिव्हर, हिरो मोटोकॉर्प, अदानी पोर्टस्, विप्रो, एचडीएफसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, भारती-एअरटेल, महिंद्रा अॅँड महिंद्रा, अॅक्सीस बॅँक, लुपिन, रिलायन्स आदींचे समभाग वधारले. तर लार्सन अॅँड टुब्रो, गेल इंडिया, एनटीपीसी, पॉवरग्रीड, डॉ. रेड्डीज लॅब आदी कंपन्यांचे समभाग घसरले.
दिवसभरात १४५७ कंपन्यांचे समभाग वधारले, १०९९ कंपन्यांचे समभाग घसरले तर १९० कंपन्यांचे समभाग स्थिरावले. दिवसभरात २३०६.६१ कोटींचे व्यवहार झाले.