सेना-भाजपा हे दळभद्री सरकार.. या सरकारचा तूच सरदार.. महापालिकेचा बघ वाली तू.. ही सोन्यासारखी नगरी बकाल केलीस तू.. भ्रष्टाचार करून जनतेला हैराण केलेस तू.. सारी मुंबई नगरी घातली खड्डयात तू!
मुंबई- सेना-भाजपा हे दळभद्री सरकार.. या सरकारचा तूच सरदार.. महापालिकेचा बघ वाली तू.. ही सोन्यासारखी नगरी बकाल केलीस तू.. भ्रष्टाचार करून जनतेला हैराण केलेस तू.. सारी मुंबई नगरी घातली खड्डयात तू! असे भजन सादर करून महापालिकेतील सत्ताधा-यांचे वाभाडे काढणारे सैराट आंदोलन मनसेने घाटकोपर येथे केले.
मुंबईतील रस्ते विकासासाठी व खड्डे बुजवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांचा खड्डय़ांतूनच बिकट प्रवास सुरू आहे. मुंबईकरांच्या मनातील हा संताप मनसेने अभिनव आंदोलनाद्वारे व्यक्त केला. रस्त्यांवरील प्रत्येक खड्डय़ांना रस्ते घोटाळयातील दोषी कंत्राटदारांची नावे देतानाच उद्धवा, अजब तुझे सरकार! असे भजनही यावेळी सादर करण्यात आले.
महेश्वरी मंदिर, असल्फा रेल्वे स्थानक, लिंक रोड, साकीनाका येथे आषाढी एकादशीचे निमित्त साधून मनसेचे उपाध्यक्ष दिलीप लांडे व विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी सैराट आंदोलन केले.
यावेळी रस्त्यांवरील खड्डय़ांना महावीर इन्फ्रास्ट्रक्चर, आर. पी. एस. इन्फ्राप्रोजेक्ट, रेलकॉन, आर. के. मधानी, जे. कुमार व के.आर. कन्स्ट्रक्शन आदी कंत्राटी कंपन्यांची नावे देण्यात आली. या नामकरण सोहळयाला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या कारभाराचे वाभाडे काढणारी ‘मुंबई खड्डयात घातली’ या झिंगाट सीडीचे प्रकाशनही करण्यात आले.
सैराटमधील झिंग झिंग झिंगाटच्या चालीवर ठेका धरत मुंबई खड्डयात घातली, हे गीत रचण्यात आले आहे. या गाण्यावर ठेका धरून झिंग झिंग झिंगाट आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात चांदिवली विधानसभा विभाग संघटक अशोक माटेकर, उपविभाग अध्यक्ष राजेंद्र पाटील, शाखाध्यक्ष दत्ताराम गुरव, संजय मुळे, महेंद्र भानुशाली, राजू साळवी, सलीम शेख, विकास डिके, रतीलाल आगरथडे, शुभ्रांशू दीक्षित, प्रणव दिलीप लांडे यांच्यासह मोठया संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.