निवडणुकांत हार-जीत होतच असते. पण एखाद्याला पराभव झोंबला तर.. तशीच काहीशी अवस्था मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांची झालेली दिसते.
मुंबई- निवडणुकांत हार-जीत होतच असते. पण एखाद्याला पराभव झोंबला तर.. तशीच काहीशी अवस्था मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांची झालेली दिसते. नगरसेवकपदावर असताना देशपांडे यांनी शिवाजी पार्कात साकारलेला सेल्फी पाईंट बंद करण्यात आलेला आहे. यासाठी सीएसआर फंडाचे कारण पुढे करण्यात आले आहे.
पाश्चिमात्य देशात विविध ठिकाणी सेल्फी पाईंट आहेत. ते पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. त्याच धर्तीवर संदीप देशपांडे यांनी रंगीबेरंगी छत्र्या, फुलपाखरांच्या डिझान्स असलेला सेल्फी पॉईंट शिवाजी पार्कात विकसित केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन केले होते.
तरुणाईसह अबालवुद्धांचा आकर्षण ठरला होता. रविवारी संध्याकाळी तर इथे सेल्फी स्टीकने फोटो काढण्यासाठी जत्रा जमायची. कॉलेजला जाणारी तरुणाई येथे रेंगाळायची. सेल्फी पॉईंटच्या देखभालीसाठी निधी नसल्याचे कारण मनसेकडून देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवाजी पार्कमधून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना शिवसेनेच्या विशाखा राऊत यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. पराभवाने नाराज झाल्यानेच हा सेल्फी पाईंट बंद करण्यात निर्णय घेण्यात आल्याची चर्चा पार्कात फेरफटका मारणारे करीत आहेत.