कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका २६ वर्षीय तरुणीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार अर्ज देऊन न्याय मिळावा, यासाठी मागणी केली होती.
या तक्रारीमध्ये दया गायकवाड यांनी फेसबुकवर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तरुणीने म्हटले होते. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी अश्विनी धुमाळ आणि त्यांचे पती यांनी गायकवाडांना मदत केल्याचेही या तरुणीने तक्रारीमध्ये म्हटले होते. या प्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी नगरसेवक दया गायकवाडांसह त्यांना मदत करणा-या राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ आणि त्यांच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीला खंडणीच्या खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न संबंधित नगरसेवक आणि त्यांचे दोन सहकारी करत होते. या तरुणीने कल्याणच्या खडक पाडा पोलीस ठाण्यातील पोलीस वारंवार दमदाटी करत असल्याचेही सांगितले. यानंतर मात्र, तरुणीने पोलीस आयुक्तांना भेटून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आयुक्तालयाच्यासमोर उपोषण करण्याचा इशाराही तिने दिला आहे.
जून ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत दया गायकवाड यांनी फेसबुकवरुन आपल्याशी ओळख केली. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर दया विवाहित असल्याचे समजल्यानंतर, त्याने धमक्या देणे सुरु केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी अश्विनी धुमाळ आणि त्यांचे पती मनोज धुमाळ यांनी घरी बोलावून दयाकडे पैसे आणि घर मागण्यास सांगितले आणि त्याचे रेकॉर्डिंग करुन खंडणीची खोटी केस टाकण्याची धमकी दिली. याचा गैरफायदा घेत दयाने पुन्हा आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली होती.
त्यानुसार ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात दया गायकवाड यांच्यासह अश्विनी आणि मनोज धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यास मदत केल्याबद्दल दोघांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर या तिन्ही आरोपींनी फोन बंद केले आहेत.
दरम्यान यासंदर्भात नगरसेवक दया गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधीत तरुणीने फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली होती. तेवढीच तिच्यासोबत माझी ओळख आहे. त्यानंतर तिची आई व तिने माझ्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर मला ती फोन करुन धमकावत राहिली. या प्रकरणी माझ्या पत्नीने तिच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. तिच्याकडून ब्लॅकमेल सुरु असल्याचा उलट आरोप गायकवाड यांनी केला आहे.