दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी १० वर्षे याप्रमाणे एकूण २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
सिरसा- दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी १० वर्षे याप्रमाणे एकूण २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ३० लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी १४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.
दोन्ही गुन्ह्यांसाठी प्रत्येकी १० वर्षे शिक्षा झाली असल्याने, बाबाला तब्बल २० वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. शिक्षा सुनावल्यावर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले.
सीबीआय न्यायालयाचे न्या. जगदीप सिंह यांना विशेष हेलिकॉप्टरने दुपारी रोहतक येथे आणण्यात आले. तेथून ते तेथील सुनरिया तुरुंगात गेले आणि त्यांनी बाबाला शिक्षा सुनावली. ती सुनावताच, बाबा राम रहीम धाय मोकलून रडू लागला आणि माफीची मागणी करू लागला. ‘माझ्यावर दया दाखवा, मी समाजसेवक आहे,’ असे तो हात जोडून सांगत होता. त्याच्या वकिलांनीही त्याची सजा कमी करावी, अशी मागणी केली, पण शिक्षेत बदल झाला नाही.
‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले असून अटक करण्यात आली आहे. पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या न्यायालयात बाबा राम रहीम याच्यावरील आरोप सिद्ध करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
गुरुमीत राम रहीम याच्यावर बलात्कार, खुन व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्याने आपल्या ४०० पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. पंजाब व हरयाणा या दोन्ही राज्यांत डेरा सच्चा सौदाचे लाखो अनुयायी आहेत.