रायगड जिल्ह्यातील जलस्त्रोतांची माहिती जाम करून ती ऑनलाइन करण्याचे काम सध्या सुरू आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यातील जलस्त्रोतांची माहिती जाम करून ती ऑनलाइन करण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे जीपीएसद्वारे निश्चितीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. नवीन प्रणालीमुळे गावांतील भूगर्भात किती पाणी शिल्लक आहे, तसेच तेथे किती विहिरी अथवा कुपनलिका आहेत. याचीही माहिती मिळणार आहे. या नवीन प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय टळता येणार असून भूगर्भातील पाण्याचा अनावश्यक उपसाही थांबणार आहे.
रायगड जिल्ह्यातील हातपंप १५८५, दुहेरी पंप ९२, विहीर २८३८, नळ योजना १०६०, लघु नळयोजना १४५, प्रादेशिक नळयोजना २८३ यांचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यात ६६१, पेण ४२१, सुधागड ४२९, पनवेल ४६७, उरण १४७, कर्जत ४८९, खालापूर ४१२, रोहा ४१३, मुरूड १४८, माणगाव ५१२, तळा २५९, म्हसळा १३२ , श्रीवर्धन ४१३, महाड ८१८ व पोलादपूर तालुक्यात २८२ सर्व असे मिळून ६ हजार ३ पाण्याचे स्त्रोत पिण्यासाठी योग्य आहेत.
एडीसीसी इन्फोकॅड या संस्थेने जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील पाणी स्त्रोताची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जीपीएसद्वारे स्त्रोत निश्चितीकरण केले जाईल. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मॅपिंग केले जाईल. जिल्हा परिषद प्रशासनाकडे नोंद असणारे स्त्रोत आणि इन्फोकॅडने मॅपिंग केलेले स्त्रोत यांची माहिती एकत्र करून स्त्रोत निश्चित केले जाणार आहेत. हे काम सुरू आहे.
जीपीएस मॅपिंग स्त्रोत निश्चितकरण झाल्यावर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये जलसुरक्षा रक्षक गट समन्वयक, गट समूह समन्वयक, पाणी गुणवत्ता सल्लागार, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, ग्रामलेखा समन्वयक, गटविकास अधिकारी यांना पाणी गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठीचे प्रशिक्षण इन्फोकॅड कंपनीमार्फत देण्यात येणार आहे.