रायगड जिल्ह्यातील ४८ जुन्या पुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी २१ पुलांची दुरुस्ती, पुनर्बाधणी करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले.
अलिबाग- रायगड जिल्ह्यातील ४८ जुन्या पुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी २१ पुलांची दुरुस्ती, पुनर्बाधणी करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ७ पुलांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित १४ कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला. शासकीय विभागांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी जिल्हय़ाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेतला. शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना येणा-या अडचणीही संबंधित अधिका-यांकडून जाणून घेतल्या. तसेच होत असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत मंत्रालय स्तरावरील कामांची सूची तयार करून त्याचा पाठपुरावा करणे, आगामी अर्थसंकल्पात जिल्हय़ातील विविध विकास क्षेत्रांसाठी निधीची मागणी करणे आदी विषयांबाबत मेहता यांनी आढावा घेतला.
किल्ले रायगडाच्या विकासासाठी शासनाने ६०६ कोटी रुपयांचे पॅकेज दिले असून त्या अंतर्गत करावयाच्या कामांत पर्यटकांची गडावर ने-आण करण्यासाठी रोप वे सुविधेचा विस्तार, गडाची मार्गक्रमिका विस्तार व विकास करणे, गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या निगराणीत संवर्धन करणे आदी कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातून सेवानिवृत्त सहा अधिका-यांचे पथक मदत करणार आहे. रायगड किल्ल्याकडे जाणा-या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास आली असून काम लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.
जिल्हय़ात शहरी भाग १०० टक्के हागणदारी मुक्त झाला आहे. ग्रामीण भागात ९७ टक्के काम झाले असून तीन तालुक्यात अपूर्ण असलेले काम हे लवकरच पूर्ण होऊन या महिन्याअखेर जिल्हा संपूर्ण हागणदारी मुक्त होईल, असा विश्वास यावेळी मेहता यांनी व्यक्त केला. २१ ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयातून नियुक्त ग्रामप्रवर्तक नियुक्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
[EPSB]
पूजा हेगडे घेत आहे अॅक्शनचे धडे
[/EPSB]