एका व्हायरल व्हिडिओचा आधार घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे.
नवी दिल्ली- एका व्हायरल व्हिडिओचा आधार घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘एनडीएचे गरीबांविषयीचे धोरण’ असे लिहून हा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. ज्यामध्ये एक प्रेमी युगुल हॉटेलमध्ये बिल देताना दिसत आहे. मुलगा पैसे देत असतो तेव्हा मुलगी त्याला आग्रह करून थांबवते आणि म्हणते बिल मी देणार. मग वेटरला स्वतःच्या पर्समधली नोट काढून देते आणि मुलाने दिलेली नोट स्वतःच्या पर्समध्ये टाकते. दहा सेकंदाच्या या व्हिडिओनंतर आपल्याला हसू आवरत नाही.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण या व्हिडिओतल्या मुलीसारखे आहे, अशी टीका करत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींवर निशाणा साधला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस विरूद्ध भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांची लढाई रंगली आहे.
याआधी पंतप्रधान आणि आरबीआय यांनी चलनातून बाद झालेल्या नोटा मोजण्यासाठी गणिताचा शिक्षक नेमावा असे ट्विट करत राहुल यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. आता ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर व्यंगात्मक टीका केली आहे.
अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यावरूनही राहुल गांधी यांनी ट्विटवरवरून नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली होती.
काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांचा व्हिडिओ पोस्ट करून या व्हिडिओ वॉरची सुरूवात केली होती. मीरा कुमार या यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्यावर टीका करताना एका व्हिडिओचा वापर सुषमा स्वराज यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसनेही सुषमा स्वराज यांना एक व्हिडीओ पोस्ट करून प्रतिउत्तर दिले होते. आता राहुल गांधी यांनी ट्विट केलेल्या विनोदी व्हिडिओविरोधात भाजप कोणते उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
NDA pro-poor policies pic.twitter.com/TMpYGcOHVW
— Office of RG (@OfficeOfRG) July 14, 2017