काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी सोमवारी कॉँग्रेस कार्य समितीने एकमुखाने केली.
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी सोमवारी कॉँग्रेस कार्य समितीने एकमुखाने केली. कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कार्य समितीची बैठक झाली.
काँग्रेसच्या कार्य समितीच्या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, जनार्दन द्विवेदी, अहमद पटेल, अंबिका सोनी आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती.
या संघटनात्मक निवडणुका पुढील वर्षी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली. या मागणीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अनुमोदन दिले.
त्यानंतर काँग्रेस कार्य समितीच्या सदस्यांनी एकमुखाने ही मागणी केली. त्यानंतर आपल्या भावना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णयही समितीने घेतला.