बहुजन समाज पार्टी आणि उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या कारभारावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवला.
आझमगढ, यूपी- हत्तीने सर्व पैसा खाल्ला, त्याला तुम्ही पिटाळून लावले. आता पाच वर्षे सत्तेत असूनही लोकांना साधे रेशनिंग कार्ड देऊ न शकणारी सायकलही पंक्चर झाली आहे, अशा कठोर शब्दांत बहुजन समाज पार्टी आणि उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या कारभारावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवला.
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझमगढ येथे रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. हाथी सारा पैसा खा गया. हाथी को आपने मार के भगा दिया. फिर आप साईकल लाए. उसका टायर पंक्चर है और आपको रेशन कार्ड नही दिला पा रहा है, अशी जोरदार टोलेबाजी करत राहुल सपा आणि बसपावर बरसले.
आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या हातात सत्ता द्या, तुमची निराशा होऊ देणार नाही, असा विश्वास शेतक-यांना दिला.
पंधरा लाखांचा सूट खराब होईल म्हणून मोदी शेतक-यांना भेटणे टाळतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौ-याचा समाचार घेताना, ‘मोदीजी आपल्याच दुनियेत रमले आहेत. ‘जनता त्रस्त, मोदीजी मस्त’, अशी परिस्थिती आहे,’ असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला.
१५ लाख रुपयांचा सूट खराब होईल म्हणून पंतप्रधान मोदी शेतक-यांची भेट घेणे टाळतात. मात्र अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची आवर्जून भेट घेतात, असा टोलाही राहुल यांनी लगावला.