गोवा विधानसभेसोबतच शनिवारी पंजाब विधानसभेसाठी मतदान होत आहे. पंजाबमध्ये ११७ जागांसाठी सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजपा युती, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात तिहेरी लढत होणार आहे.
चंदीगढ- गोवा विधानसभेसोबतच शनिवारी पंजाब विधानसभेसाठी मतदान होत आहे. पंजाबमध्ये ११७ जागांसाठी सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजपा युती, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात तिहेरी लढत होणार आहे.
आम आदमी पक्षाने पंजाबची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून; या विधानसभेसाठी आपला मुख्यमंत्रीही जाहीर केला आहे; मात्र या निवडणुकीत इतर पक्षांकडून कोणताही दगाफटका होऊ नये व मतदारांची पैसे आणि दारूचे आमिष दाखवून फसवणूक होऊ नये म्हणून आम आदमी पक्षाचे तब्बल १५ हजार कार्यकर्ते मतदानादिवशी ‘छुप्या कॅमे-यांनिशी’ मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून असणार आहेत.
मतदानादरम्यान कोणतीही आक्षेपार्ह कार्यवाही होऊ नये म्हणून खुद्द आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये तळ ठोकून आहेत. आम्ही आमचे १५ हजार कार्यकर्ते राज्यभरातील मतदान केंद्रांबाहेर तैनात केले आहेत. हे सर्व कार्यकर्ते छुपे कॅमेरे, बटन होल कॅमेरे आणि की-चेन कॅमे-यांनी सज्ज आहेत. हे कार्यकर्ते मतदानादरम्यान होणा-या आक्षेपार्ह कारवायांवर लक्ष ठेवून राहतील, अशी माहिती पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिली.
अशी आक्षेपार्ह कारवाई आढळताच आमचे कार्यकर्ते थेट चंदीगढ येथे निवडणूक आयोगाशी संपर्क साधून आयोगाला तात्काळ कारवाई करण्यास भाग पाडतील, असेही त्यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांना मागील १५ ते २० दिवस छुपे कॅमेरे कसे हाताळायचे, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, आपने ही कार्यपद्धती दिल्ली निवडणुकांदरम्यानही अवलंबली होती. त्यातून त्यांनी पैसे आणि दारूचे वाटप करताना अनेक व्यक्तींना कॅमे-यात पकडले होते.