प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील उपांत्य फेरी शुक्रवारी (२९ जुलै) हैदराबादमधील गॅचिबावली इनडोअर स्टेडियमवर रंगेल.
हैदराबाद- प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील उपांत्य फेरी शुक्रवारी (२९ जुलै) हैदराबादमधील गॅचिबावली इनडोअर स्टेडियमवर रंगेल. पहिल्या लढतीत पुणेरी पलटनसमोर पाटना पायरेट्सचे आव्हान आहे. दुस-या लढतीत माजी विजेता जयपूर पिंक पँथर्स तेलुगू टायटन्सशी दोन हात करेल.
चौथ्या मोसमातील साखळीचा विचार करताना पाटना पायरेट्स सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. त्यांनी १४पैकी १० सामने जिंकलेत. यंदाच्या हंगामात दहा सामने जिंकणारा तो एकमेव संघ आहे. पाटनाने सलग पाच सामने जिंकण्यासह एकदा हॅट्ट्रिक साधली आहे. उपांत्य फेरीत पाटनासमोर चौथ्या स्थानावरील पुणेरी पलटन आहे. पुण्याची कामगिरी संमिश्र आहे. त्यांनी सहा सामने जिंकलेत.
तितक्याच सामन्यांत पराभूत व्हावे लागले. पुण्यावर सलग चार पराभवांची नामुष्कीही ओढवली होती. साखळीतील कामगिरी पाहता पाटनाचे पारडे जड वाटते. मात्र पुण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेलुगू टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील लढत चुरशीची अपेक्षित आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी आठ सामने जिंकलेत. मात्र तेलुगूच्या तुलनेत जयपूरने एक जास्त पराभव पाहिला आहे.
वैयक्तिक कामगिरीचा विचार करता तेलुगूच्या राहुल चौधरीने यशस्वी चढाई करताना ८९ गुण मिळवलेत. दुस-या क्रमांकावर पुणेरी पलटनचा दीपक निवास हुडा (८८ गुण) आहे. पाटनाचा परदीप नरवालसह (८० गुण) रोहित कुमार (७५ गुण) आणि यू मुंबाच्या अनुप कुमारने (६० गुण) अव्वल पाच कबड्डीपटूंमध्ये स्थान राखले आहे. सर्वाधिक चढाई गुण मिळवण्यात राहुलसह (११९ गुण), परदीप (१०७ गुण) आणि दीपक (१०१ गुण) आघाडीवर आहेत. तिघांनीही गुणांचे ‘शतक’ पूर्ण केले आहे.