खाजगी गोष्ट सोशल मिडियावर सांगितल्याने पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील हडपसर शहरामध्ये घडली.
पुणे- खाजगी गोष्ट सोशल मिडियावर सांगितल्याने पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर शहरामध्ये घडली.
राकेश बाळासाहेब गांगुर्डे (३४) असे आत्महत्या करणा-या पतीचे नाव आहे. तर सोनाली गांगुर्डे (२८) हीची गळा दाबून राकेशने हत्या केली.
सोनाली आणि राकेशचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे दोघे मुळचे नाशिकचे होते. गेल्या तीन वर्षापासून ते पुण्यातील हडपसर येथे राहत होते.
सोनालीच्या आईने बुधवारी दिवसभर सोनाली हिला फोन लावला. मात्र, त्यांनी फोन उचलला नव्हता. त्यामुळे त्यांचा भाऊ हर्षल पवार हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी गेले. खूप वेळ आवाज दिल्यानंतर काही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. पत्नीची हत्या करण्यापूर्वी राकेश गांगुर्डे याने सुसाईड नोट लिहिली होती.
घरातील समस्या आणि त्यांना मूल होत नसल्याने डॉक्टर उपचार सुरु होते. ही बाब सोनाली य़ांनी व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवरून मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर केली. याचाच राग अनावर झाल्याने राकेशने गळा दाबून सोनालीची हत्या केली, असे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत नमूद केले आहे.
सोनाली गांगुर्डे हिने बी. ई. पर्यंतचे शिक्षण घेतले होते. मात्र ती कुठे ही कामाला जात नव्हती. तर राकेश गांगुर्डे हा एका खासगी आयटी कंपनीमध्ये कामाला होता.
हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत. उच्च शिक्षित पतीकडून असा प्रकार झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.