आपल्या बाळाला पळवून नेले नसून आपणच त्या बाळाला नदीत फेकले असल्याची कबुली त्या बाळाच्या आईने पोलिसांसमोर दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
पुणे- रिक्षातून प्रवास करणा-या एका सहप्रवासी महिलेने धक्का देऊन आपल्या बाळाला पळवून नेले नसून आपणच त्या बाळाला नदीत फेकले असल्याची कबुली त्या बाळाच्या आईने पोलिसांसमोर दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
रेश्मा शेख (२०) हिला तीन मुली असून तिने तिसरे अपत्यही मुलगीच झाल्याने हे क्रूर कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.
रेश्मा शेख या खडकी येथील एका खासगी रुग्णालयात आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. बोपोडी येथे मंगळवारी सकाळी रिक्षातून प्रवास करणा-या एका सहप्रवासी महिलेने चक्क बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळविल्याची घटना घडली होती. परतत असताना त्यांनी शेअर रिक्षा केली होती.
त्या रिक्षात आधीपासूनच एक महिला प्रवास करत होती. शेख ही पैसे देण्यासाठी खाली उतरली असता आतील महिलेने तिच्या जवळील बाळ हिसकावून रिक्षातून ती पळून गेली, अशी तक्रार रेश्मा शेख हिने खडकी पोलिसात दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी रिक्षावाला व अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस तपासात रेश्मा शेख हिने दिलेली माहिती संभ्रमात टाकणारी वाटली. यामुळे पोलिसांनी रेश्मा हिच्याकडे कसून चौकशी केली असता आपणच आपले बाळ सांगवीच्या पुलावरून मुळा नदीपात्रात फेकल्याची कबुली तिने दिली आहे.
त्याप्रमाणे पोलीस व बचाव पथक नदीपात्रात मृतदेह शोधत आहेत. जोपर्यंत तान्ह्या मुलीचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत नेमके काही सांगता येत नाही, असे खडकी पोलिसांचे म्हणणे आहे.