पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याने दुस-या कैद्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
पुणे- पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याने दुस-या कैद्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखदेव मेघराज महापूर (४३) असे खून करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. तर आरोपी दिनेश दबडे (३५) हा हत्येच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
येरवडा कारागृहात सुखदेव आणि दिनेश किचनमध्ये एकत्र काम करत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात दिनेशने मागून येऊन सुखदेवच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये सुखदेवचा जागीच मृत्यू झाला.
सुखदेव महापूर याला अपहरणाच्या गुन्ह्यात साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मागील सात महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचबरोबर आरोपी आणि खून झालेले कैदी दोघेही एकत्र राहत होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.