देशाचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवार १७ जुलै मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून एनडीएकडून उभे असलेले उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे.
नवी दिल्ली – देशाचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवार १७ जुलै मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून एनडीएकडून उभे असलेले उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. तर विरोधकांकडून मीरा कुमार यांनीही जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी उभे असलेले दोन्ही उमेदवार दलित आहेत, हे विशेष.
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार असल्याने नवे निवडण्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी १७, रोजी संसद भवन, राज्यातील विधानसभांमध्ये सकाळी दहा ते पाच वाजे दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभा सदस्यांसोबत राज्यातील विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत. एका खासदाराच्या मतदानाची किंमत ७०८ इतकी आहे. आमदारच्या मतांची किमती ज्या-त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार ठरलेली आहे. नव्या राष्ट्रपती निवडीसाठी एकूण मतांची संख्या दहा लाख ९८ हजार ९०३ इतकी आहे. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या पारडय़ात ६३ टक्के मतदान पडण्याची शक्यता आहे. कोविंद यांना सर्व प्रमुख तसेच इतर पक्षांचा पाठिंबा आहे. दरम्यान, कॉँग्रेसने विचारधारेचा मुद्दा करून १८ विरोधकांना एकत्र करत या निवडणुकीत रंग भरला आहे. या निवडणुकीत ४८९६ मतदार असून त्यामध्ये ४१२० आमदार आहेत तर ७७६ खासदार असून ते मतदान करण्यास पात्र आहेत. राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांना या निवडणुकीसाठी मदतान करण्याचा अधिकार नसतो.
लोकसभा अध्यक्ष देखील या निवडणुकीत मतदान करू शकतात. या शिवाय दोन अँग्लो इंडियन सदस्य देखील मतदानाचा हक्क बजावू शकतात. राज्यसभेचे १२ सदस्यांना यात मतदान करता येत नाही. गोपनिय मतपत्रिकद्वारे होणा-या मतदानासाठी शिवसेनेसह एनडीएकडे पाच लाख ३७ हजार ६८३ मतदार आहेत. त्यांना आणखी १२ हजार मतांची गरज आहे. दरम्यान, बीजू जनता दर, तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर कॉँग्रेससह अन्ना द्रमुकचा एक भाग एनडीएचे उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दर्शवण्याच्या तयारीत आहे. मतदाननंतर सर्व राज्याच्या राजधानीतून मतदान पेटय़ा आणल्या जातील. त्यानंतर त्याची मतमोजणी होवून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड जाहीर केली जाईल. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती पदाभार स्वीकारतील.