राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि नागपूर महापालिकांच्या तीन प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भांडूपमधील प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपच्याच उमेदवार विजयी झाल्या आहेत.
मुंबई- राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि नागपूर महापालिकांच्या तीन प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भांडूपमधील प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपच्याच उमेदवार विजयी झाल्या आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग ३५ च्या पोटनिवडणुकीत भाजपचे संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला. संदीप गवई यांना ५,७११, तर थोरात यांना ५,२४८ मते मिळाली. या निवडणुकीत केवळ २४.३३ टक्के मतदान झाले होते. मतदान कमी झाल्याने निकाल कुणाच्या बाजूने लागतो याबद्दल संभ्रम होता. या निवडणुकीत ७ उमेदवार रिंगणात होते. सत्ता स्थापनेच्या दोन महिन्यातच प्रभाग ३५ (अ) मधील भाजप नगरसेवक नीलेश कुंभारेंचे निधन झाले होते. त्यामुळे येथे निवडणूक लागली होती.
कोल्हापुरात ‘ताराराणी’चे यश
कोल्हापूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झाले. शहरातालील प्रभाग क्र. ११ ताराबाई पार्क येथे ही पोटनिवडणूक होती. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव करत ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी बाजी मारली. लाटकर यांना ११९९, तर ताराराणी आघाडीचे शिरोळकर यांना १३९९ मतं मिळाली. ताराराणी आघाडीचे तत्कालीन नगरसेवक नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली होती.
पुण्यात हिमाली कांबळे विजयी
पुणे महानगरपालिकेच्या कोरेगाव घोरपडी पोटनिवडणुकीत ४ हजार ४८३ मतांनी भाजप-आरपीआय युतीच्या हिमाली कांबळे विजयी झाल्या आहेत. प्रभाग २१ अ कोरेगाव पार्क घोरपडी पोटनिवडणुकीत २०.७८ टक्के इतके अल्पमतदान झाले होते. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळे यांना युतीकडून उमेदवारी देण्यात आली. हिमाली कांबळे यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धनंजय गायकवाड हे रिंगणात होते. मनसे, शिवसेनेचा येथे उमेदवार दिलेला नव्हता. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. हिमाली कांबळे यांना ७ हजार ८९९ मते, तर राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांना ३ हजार ४१६ मते मिळाली.
[EPSB]
[/EPSB]