नेरुळमधील एका शाळेमध्ये आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीवर अत्याचार करणा-या शिक्षकाला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
नवी मुंबई- नेरुळमधील एका शाळेमध्ये आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीवर अत्याचार करणा-या शिक्षकाला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. एक महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी दिरंगाईने तपास केला असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी खारघरमधील एका ‘प्ले स्कूल’मधील दहा महिन्याच्या बालिकेवर अत्याचार झाल्यावर देखील तपासकामात अशीच दिरंगाई झाली होती. त्यामुळे या प्रकरणी या बालिकेच्या पालकांना मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागली होती.
नेरुळमधील ‘एमजीएम’ या शाळेतील आठवीच्या वर्गातील ही विद्यार्थिनी पोट दुखत असल्याने वर्गात बसली होती. त्यावेळी वर्गातील इतर विद्यार्थी मैदानात खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी शिक्षक हरिशंकर शुक्ला याने वर्गातच या मुलीवर अत्याचार केले.
तसेच या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनाही ठार मारण्याची धमकी या शिक्षकाने दिल्याची तक्रार करण्यात आली होती. शुक्ला हा या वर्गात इंग्रजी विषय शिकवत होता. त्याच्याविरोधात इतर विद्यार्थ्यांनीही गैरवर्तनाच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे प्रकरण घडून एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
त्यामुळे पीडित बालिकेच्या पालकांनी महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. तसेच आमदार मंदा म्हात्रे याप्रकरणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी पालकांना सांगितले होते. या प्रकरणातील पीडित मुलीचा अत्याचारानंतर गर्भपात करण्यात आला. त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आले.