गेल्या १९ दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होताच वाढ झाली आहे.
नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या १९ दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मतदान होताच वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने ही दर वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.
मात्र निवडणूक काळात गेल्या १९ दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर अनेकदा वाढूनही पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती.
या दर वाढीमुळे डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. तर पेट्रोलने देखील ५६ महिन्यांमधील सर्वाधिक दर नोंदवला आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोल ८२ रुपये ६५ पैसे प्रतिलिटर, तर डिझेल ७० रुपये ४३ पैसे प्रतिलिटर झाले. दिल्लीतही पेट्रोल ७४ रुपये ८० पैसे प्रतिलिटर, तर डिझेल ६६.१४ रुपये प्रतिलिटर आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींप्रमाणे बदलत होते. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्याच्या १९ दिवसांपासून या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
याआधी २४ एप्रिलला पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र यानंतर १९ दिवस सरकारच्या सांगण्यानुसार, पेट्रोलियम कंपन्यांनी दरांमध्ये कोणतीही वाढ केली नाही. या १९ दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर प्रति बॅरल ७४.८४ डॉलरवरुन ८२.९३ डॉलरवर पोहोचले. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना ५०० कोटींना भूर्दंड सोसावा लागल्याचे समजते.