सध्या देशभरात पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून चर्चा सुरू असून संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेलच्या वाढीव दराचा फटका बसत असताना, सरकार मात्र दर कमी करण्यास तयार नाही.
बेंगळुरू- सध्या देशभरात पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून चर्चा सुरू असून संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेलच्या वाढीव दराचा फटका बसत असताना, सरकार मात्र दर कमी करण्यास तयार नाही. विरोधकांनीही मुद्दा हाती घेतला असून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावरही हा विषय चांगलाच रंगला असून एकीकडे काहीजण विरोध करत असताना, काहीजण ही वाढ कशी योग्य आहे हे पटवण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल महागले असताना, कर्नाटकमध्ये मात्र तुलनेने दर कमी आहेत. नेमके याच गोष्टीवरून कर्नाटकने महाराष्ट्राला डिवचवण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपावर महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील निप्पाणीतील लक्ष्मी ट्रेड्रिंग कंपनी या पेट्रोल वितरकाने याबाबतचे फलक महामार्गावर लावले आहेत. या फलकांमध्ये महाराष्ट्रापेक्षा साडेतीन रुपये कमी दराने डिझेल, तर नऊ रुपये कमी दराने पेट्रोल मिळेल असे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे तब्बल १४ रुपयांनी वाढ करत सरकारने सर्वसामान्यांच्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नावर पाणी टाकले आहे. एकीकडे देशाच्या राजधानी दिल्लीत वर्षभरापासून प्रति लिटर पेट्रोलसाठी ७० रुपयांखाली दर आकारले जात असताना, मुंबईतील दर मात्र सत्तरीवरच असल्याची माहिती उघडकीस आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत विकले जात आहे. आजघडीला मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रति लीटर ७९.४१ रुपये मोजावे लागत आहेत. उर्वरित महाराष्ट्रात दुष्काळी कराचा समावेश करून सरासरी ७५ रुपयांनी पेट्रोल मिळत आहे. आधीच राज्यात संताप व्यक्त होत असताना कर्नाटकने मात्र महाराष्ट्रातील जनतेला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ मध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर ७० रुपयांपेक्षा जास्त होती. कच्च्या तेलाची किंमत १०३ डॉलरप्रति बॅरेल होती.
१४ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत ५५ डॉलर प्रति बॅरेल होती. त्यामुळे सध्याच्या दरानुसार भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एक लीटर पेट्रोल अवघ्या २१ रुपयांना मिळते. त्यावर प्रक्रिया करून वापरण्याजोगे बनवण्यात त्याला १० रुपये खर्च होतो. म्हणजे सरकारने कोणता टॅक्स आकारला नाही, तर ३१ रुपयांमध्ये पेट्रोल मिळू शकते. पण सध्याच्या करव्यवस्थेत केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारला जातो. राजधानी दिल्लीत २७ टक्के व्हॅट तर मुंबईत ४८ टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. जर पेट्रोलियम पदार्थाचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला तर त्यावर २८ टक्के कर आकारला जाईल. जर सरकारने १२ टक्के जीएसटी आकारला तर सामान्य व्यक्तीला ३८ रुपये, १८ टक्के जीएसटी आकारला तर ४० रुपये आणि २८ टक्के जीएसटी आकारला तर ४४ रुपये सामान्य माणसाला मोजावे लागतील.
[EPSB]
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचे भूमिपूजन वाजतगाजत झाल्यानंतर ही सेवा प्रत्यक्ष चालविण्यासाठी खासगी कंपन्यांचे मुक्तहस्ताने स्वागत करण्याचे धोरण आखले जात आहे.
[/EPSB]